भाजपचा सावध पवित्रा ! मित्रपक्षांसोबत करणार बैठक ; डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रकरणाचा वाद की नंबर गेमवर होणार चर्चा?, काय आहे नेमकं कारण?

BJP meeting with allies । लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने आपल्या आघाडीच्या (NDA) मित्रपक्षांशी समन्वय राखण्यावर भर दिला असल्याचे दिसत आहे. त्यासाठी भाजपने आपल्या मित्रपक्षांसोबत बैठक आयोजित केल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या घरी आज ही बैठक होणार असल्याचे म्हटले जात आहे.
माजी पंतप्रधान अटलबिहार वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ही बैठक होत आहे, पण देशात सध्या सुरु असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुद्द्यावरून वाद सुरू असताना भाजपला एकही संधी सोडायची नाही आणि मित्रपक्षांशी संबंध दृढ करायचे आहेत, अशी चर्चा सध्या सुरु आहे. दुसरीकडे काँग्रेसने हा मुद्दा पूर्णपणे उचलून धरला असून भाजपवर राजकीय हल्ले तीव्र केले आहेत.
राजकीय मुद्द्यांवर मित्रपक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न BJP meeting with allies ।
लोकसभा निवडणूकीचे निकाल समोर आल्यापासून भाजपचे युतीतील मित्रपक्षांवरचे अवलंबित्व लक्षणीयरित्या वाढले आहे. कारण एकट्या पक्षाकडे बहुमत नाही. त्यांना जेडीयू, टीडीपीचा पाठिंबा आहे. अशा स्थितीत भाजप सध्याच्या राजकीय मुद्द्यांवर मित्रपक्षांकडून आश्वस्त राहण्याचा आणि त्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो असे मानले जात आहे. एका संकेतस्थळानुसार भाजप अनेक मुद्द्यांवर आपल्या मित्रपक्षांचा पाठिंबा घेऊ शकते. विरोधकांच्या विरोधात एकत्र येण्याची चर्चा होऊ शकते.
आंबेडकरांच्या मुद्द्यावर भाजपने घेरले आहे का? BJP meeting with allies ।
2024 च्या लोकसभा निवडणुकीत ‘संविधान’वर विरोधकांनी चालवलेल्या मोहिमेमुळे भाजपला मोठा फटका बसल्याचे मानले जात आहे. भाजपला संविधान रद्द करायचे आहे, अशी मोहीम विरोधकांनी चालवली आणि ही मोहीम लोकांपर्यंत नेण्यात विरोधकांना यश आले.
आता गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर विरोधक या मुद्द्याचे अशाच प्रकारे भांडवल करू शकतात, अशी भीती भाजपला वाटत आहे. दरम्यान, राज्यसभेत गृहमंत्री अमित शाह यांनी “आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर… म्हणणं ही आजकाल एक फॅशन झाली आहे. एवढे जर तुम्ही देवाचे नाव घेतले असते तर तुम्हला स्वर्ग मिळाला असता असे विधान केले होते. या त्यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसने हा बाबासाहेबांचा अपमान असल्याचे सांगत अमित शाह यांनी माफी मागावी आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.





