भाजप नेत्या सोनाली फोगट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; टिकटॉकच्या व्हिडीओमुळे मिळाली होती प्रसिद्धी

नवी दिल्ली : भाजप नेत्या सोनाली फोगट यांचे आज सकाळी गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म टिकटॉकवरील व्हिडीओंमुळे त्या प्रचंड प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. भाजपने त्यांना हिसार जिल्ह्यातील आदमपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र, त्या या निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या.
2019 च्या निवडणुकीत आदमपूर विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे नेते कुलदीप बिश्नोई विरुद्ध सोनाली फोगाट असा सामना होता. यात कुलदीप बिश्नोई यांचा विजय झाला. यानंतर भाजपच्या हरियाणा युनिटने त्यांची महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली होती.
शॉर्ट व्हिडीओ आणि राजकारणच नव्हे, तर सोनालीने छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. सोनाली फोगाटने निधनाच्या काही तासांपूर्वी म्हणजेच सोमवारी रात्री इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. टिकटॉकसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध असलेल्या सोनाली फोगाट यांनी बहुचर्चित ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोच्या 14व्या सीझनमध्ये भाग घेतला होता.
सोनाली फोगाट यांनी आपल्या तिच्या करिअरची सुरुवात 2006मध्ये हिसार दूरदर्शनमध्ये अँकरिंग करण्यापासून केली होती. दोन वर्षांनंतर 2008 मध्ये सोनाली यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून सोनाली भाजपच्या सक्रिय सदस्य होत्या. सोनाली फोगाट सोशल मीडियावर खूप सक्रिय होत्या. करोनाच्या काळात त्यांनी केलेल्या कामाची माहिती त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून दिली होती. सोनाली फोगाट यांनी पंजाबी आणि हरियाणवी म्युझिक व्हिडीओमध्येही काम केले होते. ‘अम्मा’ या मालिकेत सोनाली यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.





