‘लव्ह जिहादमुळं ४०० ख्रिश्चन मुली हरवल्या’ ; केरळमधील भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान

BJP leader PC George । द्वेषपूर्ण भाषणाच्या प्रकरणात जामिनावर बाहेर असलेले भाजप नेते पीसी जॉर्ज यांनी लव्ह जिहादमुळे ख्रिश्चनांच्या ४०० मुली बेपत्ता झाल्याचे वादग्रस्त विधान केले आहे. एवढेच नाही तर त्यांनी ख्रिश्चनांनी त्यांच्या मुलींचे वय २४ होण्यापूर्वीच लग्न द्यावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. एकट्या मीनाचिल तालुक्यात ‘लव्ह जिहाद’मुळे ४०० मुली हरवल्याचा दावा त्यांनी केला आहे.
एकट्या मीनाचिल तालुक्यातून ४०० मुली हरवल्या BJP leader PC George ।
केरळमधील भाजपाचे नेते आणि पुंजर विधानसभेचे माजी आमदार पीसी जॉर्ज यांनी पुन्हा एकदा लव्ह जिहादचा मुद्दा मांडला आहे. रविवारी एका कार्यक्रमात बोलत असताना पीसी जॉर्ज म्हणाले की,” लव्ह जिहादमुळे एकट्या मीनाचिल तालुक्यातून ४०० मुली हरवल्या आहेत. त्यापैकी केवळ ४१ मुलींना परत आणण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले.
मुलींचे वय २४ वर्ष होण्याआधीच लग्न करावे BJP leader PC George ।
पीसी जॉर्ज यांनी पुढे म्हटले की, केरळमधील सद्यपरिस्थिती पाहता ख्रिश्चन पालकांनी त्यांच्या त्यांच्या मुलींचे वय २४ वर्ष होण्याआधीच लग्न लावून टाकावे. तसेच अलीकडे एराट्टूपेट्टा येथे मोठ्या प्रमाणात स्फोटके ताब्यात घेण्यात आली होती. यावर बोलताना ते म्हणाले, संपूर्ण राज्य उध्वस्त करण्यासाठी ही स्फोटके पुरेशी होती.
एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार, केंद्र सरकारने यापूर्वी २०२० साली यावर भाष्य केले होते. लव्ह जिहादला विद्यमान कायद्याअंतर्गत परिभाषित केलेले नाही. तसेच केंद्रीय यंत्रणांनी अशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद झालेली नाही,” असे सांगितले होते. सरकारने संसदेत माहिती देताना सांगितले की, संविधानाच्या कलम २५ नुसार, प्रार्थना करण्याचे, धर्माचे आचरण करण्याचे, धर्म स्वीकारण्याचे आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला देण्यात आले आहे.
पीसी जॉर्ज यांनी वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी टीव्ही चॅनेलच्या चर्चेदरम्यान अल्पसंख्याक समुदायाविरोधात चिथावणीखोर भाष्य केले होते. त्यामुळे त्यांना अटकही झाली होती. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यांना २८ फेब्रुवारी रोजी जामीन मंजूर करण्यात आला होता.





