नागपूर : राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स आता संपला आहे. भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर भाष्य केलं आहे. नेमके काय म्हणाले देवेंद्र फडणवीस जाणून घेऊया.. काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ? “आमच्या महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत. आमचं कधीही एकमेकांप्रती वेगळं मत राहिलेलं नाही. आम्ही सर्व निर्णय एकत्र बसून घेतले आहेत. निवडणुकीपूर्वीही आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ असं सांगितलं होतं. आमच्या श्रेष्ठींसोबत बसून निर्णय घेऊ असं सांगितलं होतं आणि तसंच होणार आहे. जर कोणाच्या मनात किंतू, परंतू असेल तर एकनाथ शिंदे यांनी तो दूर केला आहे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. CM पदावर एकनाथ शिंदे काय म्हणाले? “मी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला होता. सरकार बनवताना, निर्णय घेताना माझ्यामुळे अडचण होईल असं मनात आणू नका. तुम्ही आम्हाला मदत केली. अडीच वर्षं तुम्ही राज्याचा विकास करण्याची, उद्योगधंदे आणण्याची संधी दिली आहे.तुम्ही निर्णय घ्या. तुमचा निर्णय महायुती, एनडीएचे प्रमुख म्हणून जसा भाजपासाठी अंतिम असतो तसा आम्हालाही अंतिम आहे. तुम्ही निर्णय घेताना एकनाथ शिंदेंची अडचण आहे असं मनात आणू नका, मी अमित शाह यांनाही फोन करुन भावना सांगितल्या. जो काही निर्णय असेल तो मान्य असेल,” असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.