TOP 15: सोनिया गांधी यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला भाजप नेत्याची हजेरी ते चहा पिणं महागणार?; जाणून घ्या TOP 15 News
TOP 15 : राज्य, देश-विदेश, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील ताज्या घडामोडी..

TOP 15 News: 1. सुनील तटकरेंच्या विश्वासू शिलेदाराचा शिवसेनेत प्रवेश
रोहा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय झटका बसला आहे. सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रमोद म्हसकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. रोहा शहरातील बाजारपेठेत झालेल्या या जाहीर प्रवेश सोहळ्यात प्रवेशकर्त्यांनी तटकरे कुटुंबाच्या कार्यपद्धतीवर उघडपणे नाराजी व्यक्त केली. या कार्यक्रमाला मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
2. अदानी समूहाला मोठा धक्का! तारळी पम्प्ड स्टोरेज प्रकल्पाचे काम तात्काळ थांबवण्याचे वनविभागाचे आदेश
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील तारळी येथील अदानी समूहाच्या पम्प्ड स्टोरेज प्रकल्पाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची आवश्यक पूर्वपरवानगी न घेताच प्रकल्पाचे काम सुरू असल्याचे वनविभागाच्या तपासणीत समोर आले आहे. यानंतर वनविभागाने प्रकल्पाचे सर्व कामकाज तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले असून संबंधित कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तीन दिवसांच्या आत लेखी खुलासा आणि आवश्यक परवानगीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, याच प्रकल्पाविरोधात अभिनेते सयाजी शिंदे आणि सामाजिक कार्यकर्ते विवेकानंद पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे आता वनविभागाच्या आदेशानंतर तारळी प्रकल्पाचे पुढील भवितव्य काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
3. रात्रीच्या वेळी अल्पवयीन मुलींना बसमधून उतरवले; वाहक चालकावर निलंबनाची कारवाई
भंडारा आगाराच्या एसटी बस मधून प्रवास करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना रात्रीच्या अंधारात रस्त्यावर उतरविल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. त्यानंतर परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी 14 नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेची तातडीने गंभीर दखल घेतली. प्रवाशांच्या सुरक्षिततेशी कोणत्याही प्रकारची तडजोड खपवून घेतली जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. याप्रकरणी संबंधित चालक अनिल सावरे आणि वाहक उदेभान मेश्राम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
4. ‘सरकारने ज्या प्रकारे पर्यावरणाची हानी केली, तसं यापूर्वी पाहिलेलं नाही’
आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या पर्यावरणविषयक धोरणांवर टीका केली. २०१४ ते २०२६ या काळात देशातील संरक्षित क्षेत्रं, पर्यावरण संवेदनशील क्षेत्रं आणि वन्यजीवांच्या भ्रमणमार्गांमधील किमान ९९ हजार हेक्टरहून अधिक जमिनीचा वापर खाणकाम, धरणं, महामार्ग आणि अन्य प्रकल्पांसाठी करण्यास मंजुरी देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. “गेल्या दशकात या सरकारने ज्या प्रकारे पर्यावरणाची हानी केली आहे, तसं जगाने यापूर्वी पाहिलेलं नाही.
भारताने विविध आंतरराष्ट्रीय करार आणि पर्यावरणविषयक समझोत्यांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. मात्र, केंद्र सरकारच्या निर्णयांमुळे या करारांमधील बांधिलकीचं उल्लंघन होत आहे. या निर्णयांमुळे केवळ पृथ्वीच्या पर्यावरणालाच धोका निर्माण होत नाही, तर भारतालाही मोठा धोका आहे. देशाची लोकसंख्या, जैवविविधता आणि अर्थव्यवस्था लक्षात घेता पर्यावरणाचं नुकसान दीर्घकालीन परिणाम घडवू शकतं,” असा इशाराही त्यांनीसोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’द्वारे दिला आहे.
5. ऊस दराच्या प्रश्नावर १९ तारखेला पालकमंत्र्यांची बैठक
सोलापुरात वाढीव ऊस दराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सुरू असलेले आंदोलन अखेर मध्यरात्री स्थगित करण्यात आले आहे. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार संघटनेने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, येत्या १९ तारखेला सोलापूर जिल्ह्यातील ऊस दराच्या प्रश्नावर पालकमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. उद्यापासून जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बंद राहणार आहे. मात्र, १९ तारखेच्या बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्यास जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वेमार्ग रोखण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
6. रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची आमदार सुलभा खोडकेंकडून पाहणी; वर्षभरात पूल पूर्ण होणार!
अमरावती शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या राजकमल रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामाची आमदार सुलभा खोडके यांनी पाहणी केली. या उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी मार्च महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १२५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. सध्या या पुलाचे बांधकाम सुरू असून, पुढील वर्षभरात हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, पुलाचे काम सुरू असल्यामुळे शहरातील वाहतुकीवर मोठा परिणाम होत असून नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बांधकामाची गती वाढवून काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आमदार सुलभा खोडके यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.
7. “अजितदादांच्या निधनानंतर रोहित पवारांनी राजकीय भांडवल करण्यास सुरुवात केली”
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणावरून आमदार रोहित पवार यांनी ‘मफलरवाला’ नेता म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवला. त्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. यावरून भाजप आमदार परिणय फुके यांनी रोहित पवारांचा समाचार घेतला. “अजितदादांच्या दुर्दैवी निधनानंतर रोहित पवार यांनी या घटनेचे राजकीय भांडवल करण्यास सुरुवात केली आहे. सातत्याने पत्रकार परिषदा घेऊन, व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून तसेच सोशल मीडियावर पोस्ट करून ते वारंवार आरोप-प्रत्यारोप करत आहेत. यातून कुठेतरी अजितदादांची जागा घेण्याचा आणि स्वतःला त्यांचा वारसदार म्हणून प्रस्थापित करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. स्वतःचे राजकारण जमवण्यासाठी अशा प्रकारे खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्ये करणे, हा अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे,” परिणय फुके म्हणाले.
8. चहा पिणं महागणार? दूध दरवाढीचा चहा विक्रेत्यांना फटका
दूध दरात प्रतिलिटर ४ रुपयांनी वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांसह चहा विक्रेत्यांनाही महागाईचा फटका बसत आहे. दूध, साखर, चहापत्ती, अद्रक, वेलची आणि गॅसच्या वाढत्या किमतींमुळे चहाच्या व्यवसायाचा खर्च वाढला आहे. बांद्रामध्ये गेल्या २० वर्षांपासून चहा विक्री करणाऱ्या विक्रेत्याचा दूध खरेदीचा रोजचा खर्च २५० रुपयांवरून ३५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तर काही विक्रेत्यांना दररोज १५० ते २०० रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे. मात्र, चहाचे दर वाढवल्यास नियमित ग्राहक कमी होण्याची भीती असल्याने अनेक विक्रेत्यांनी सध्या दरवाढ टाळली आहे. ग्राहकांना परवडणाऱ्या दरात चहा देता यावा यासाठी विक्रेते स्वतःच महागाईचा भार सहन करत आहेत. मात्र, वाढता खर्च लक्षात घेता भविष्यात चहाच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्याची वेळ येऊ शकते, अशी प्रतिक्रिया विक्रेत्यांनी दिली आहे.
9. आता ११ अभ्यासक्रमांसाठी दोन सीईटीची संधी
राज्य सीईटी सेलतर्फे शैक्षणिक वर्ष २०२७-२८ मध्ये घेण्यात येणाऱ्या पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या २१ सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळण्यासाठी यंदा तीनऐवजी तब्बल ११ अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. यात पीजीडीएम, पीजीसीएम आणि जीएनएम नर्सिंग या तीन अभ्यासक्रमांची सीईटी प्रथमच होणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहून यंदा आणखी आठ अभ्यासक्रमांची भर घातली असून, पाच वर्षीय एलएलबी, बीएचएमसीटी, बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम, तसेच नव्याने सुरू होणाऱ्या पीजीडीएम व पीजीसीएम यांचा समावेश आहे. जानेवारी ते 10 जून 2027 दरम्यान या सर्व परीक्षा पार पडतील.
10. आजीबाई रिल्सच्या आहारी; रुग्णालयात उपचाराची वेळ
डिजिटल व्यसन केवळ लहान मुले आणि तरुण वर्गालाच नाही तर, आता ज्येष्ठ नागरिकांनाही विळखा घातला आहे. नुकतंच 75 वर्षीय वयोवृद्ध महिलेचा इन्स्टाग्रामवर तासन् तास रील्स पाहण्यात त्यांचा वेळ जाऊ लागला. त्या रील्स पाहण्याच्या इतक्या आहारी गेल्या की, त्यांना भूक, तहान, दैनंदिन व्यवहारांचेही भान राहिले नाही. कुटुंबीयांनी मोबाइल काढून घेतल्यानंतर त्यांनी आदळआपट केली. अखेर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र रुग्णालयात देखील आजीबाईंनी पाच रुग्णांचे मोबाइल स्वतःच्या पिशवीत ठेवल्याचे समोर आले. मोबाइलचे व्यसन किती घातक ठरू शकते, याची जाणीव या घटनेतून झाली. दरम्यान, या वयोवृद्ध महिलेवर १५ दिवस उपचार केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहितीही समोर आली आहे.
11. सोनिया गांधी यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला भाजप नेत्याची हजेरी
सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तक प्रकाशनासाठी दिल्लीत पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग उपस्थित होते. अमरिंदर सिंग हे सध्या भाजपातील मोठे नेते आहेत. मात्र या कार्यक्रमात ते पहिल्या रांगेत बसलेले पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या. ५ वर्षापूर्वी ७ पानी पत्र लिहून त्यांनी काँग्रेसचा रामराम ठोकला होता. आपल्या पत्रात त्यांनी सोनिया गांधी आणि त्यांच्या मुलांवर मध्यरात्री त्यांना पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याचा कट रचल्याचा आरोप केला होता. विशेष म्हणजे या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी कॅप्टन अमरिंदर यांना, २०२७ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी ते काँग्रेस पक्षात पुन्हा सामील होऊ शकतात का? असा सवाल केला. त्यावर त्यांनी आपण एका सामाजिक कार्यक्रमासाठी आलो होतो, असे सांगून हे स्पष्टपणे नकार दिला.
12. प्रवासी बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे मंगळवारी सकाळी भीषण रस्ते अपघात झाला. अपघाताची घटना घडली त्यावेळी बसमध्ये ३० ते ३५ जण प्रवास करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, मुनिकिरेती पोलिस ठाण्याच्या हद्दीत हरिद्वारहून चमोलीकडे जाणारी विश्वनाथ सेवेची बस आज सकाळी ऋषिकेशजवळील गुलेर परिसरात पुलावरून कोसळून खोल दरीत पडली. या अपघातामध्ये आतापर्यंत १९ जखमी प्रवाशांना वाचवून एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. प्रशासन, पोलिस आणि एसडीआरएफचे जवान घटनास्थळी बचावकार्य करत आहेत.
13. ‘मी कदाचित जिवंत परत येणार नाही’ पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानाचे पत्र
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी अदियाला जेलमधून पत्राद्वारे त्यांच्या वेदना मांडल्या आहेत. पाकिस्तानातील फेडरल कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट, सर्वोच्च न्यायालय आणि इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना लिहिलेल्या खुल्या पत्रात खान यांनी म्हटले आहे की, “एकटं तुरूंगात असल्याने माझा ब्लड प्रेशर नियंत्रणाबाहेर गेला आहे. आधी १३० मग १५० आणि आता १९३ पर्यंत पोहचले आहे. मला मेंदूतील रक्तस्राव आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका आहे आणि माझे हृदय आधीच खराब झाले आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. वयाच्या ७४ व्या वर्षात परिस्थिती मला अशा ठिकाणी घेऊन जात आहे, जिथे कदाचित मी जिवंत परतणार नाही असं त्यांनी सांगितले. एकेकाळी पाकिस्तानचे पंतप्रधान राहिलेले इम्रान खान यांनी लिहिलेले हे वेदनादायी पत्र आहे.
14. सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, पण शतक हुकलं…
सूर्यकुमार यादवने टी20 विश्वचषक जिंकल्यानंतरही संघात स्थान मिळाले नसल्याने, पुन्हा एकदा संघात कमबॅक करण्याचे निश्चित केले आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये गुजरातविरुद्ध खेळल्या गेलेल्या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात सूर्याची दमदार कामगिरी पाहायला मिळाली. गुजरातच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई करत सूर्याने मुंबईला एकतर्फी विजय मिळवून दिला. मुंबईने गुजरातचा पाच गडी राखून पराभव केला. लक्ष्याचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादवने अवघ्या 29 चेंडूंत 9 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 82 धावांची खेळी केली. सूर्याच्या या वादळी खेळीच्या जोरावर मुंबईने 200 हून अधिक धावांचा डोंगर पार करत विजय नोंदवला. त्याचे शतक थोडक्यात हुकले असले तरी मात्र सलग दुसरे अर्धशतक झळकावत त्याने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
15. अक्षय कुमार थरारक अनुभव देण्यासाठी पुन्हा सज्ज
अक्षय कुमारने ‘भूलभुलैया’, ‘लक्ष्मी’ आणि ‘भूत बंगला’ असे सर्वोत्कृष्ट ‘हॉरर-कॉमेडी’ चित्रपट दिले. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना एक थरारक अनुभव देण्यासाठी अक्षय सज्ज झाला आहे. अक्षयनं त्याच्या ‘समूक’ या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. तसेच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली. हा चित्रपट २८ मे २०२७ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. ‘समूक’च्या निमित्ताने अभिनेता अक्षय कुमार आणि दिग्दर्शक-निर्माते विपुल अमृतलाल शाह १३ वर्षांनंतर एकत्र आले आहेत. ‘आंखे’, ‘वक्त’ आणि ‘नमस्ते लंडन’ सारखे सुपरहिट चित्रपटानंतर अक्षय कुमार आणि विपुल अमृतलाल एकत्र आल्याने चाहतेही उत्सुक आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती पूर्णपणे हॉलिवूड तंत्रज्ञानाच्या मदतीने केली जाणार आहे.








