Ramayana Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर ‘रामायण’चा धुमाकूळ! १२ दिवसांत १४०० कोटींचा टप्पा पार; ‘पुष्पा २’चा विक्रम मोडण्यासाठी सज्ज
Ramayana Box Office Collection ‘रामायण’ची जादू केवळ भारतातच नाही, तर परदेशातही पाहायला मिळत आहे. जगभरातील प्रेक्षकांकडून चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, प्रदर्शनाच्या १२ दिवसांत चित्रपटाने जगभरात १ हजार ४३७.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Ramayana Box Office Collection: रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘रामायण’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड सुरूच आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या १२ दिवसांत या चित्रपटाने जगभरात १४०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या सोमवारी कमाईत घट होऊनही चित्रपटाने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. भारतात या चित्रपटाने ‘आरआरआर’च्या कमाईचा विक्रम मोडला असून, आता जगभरातील कमाईच्या बाबतीत ‘पुष्पा २’ला मागे टाकण्याचे लक्ष्य समोर आहे.
दुसऱ्या सोमवारीही बॉक्स ऑफिसवर कमाल
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. पहिल्या आठवड्यात दमदार कमाई केल्यानंतर दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाची घोडदौड कायम आहे. विशेषतः दुसऱ्या वीकेंडला चित्रपटाने पुन्हा एकदा मोठी कमाई केली.
चित्रपटाने प्रदर्शनाच्या दहाव्या दिवशी म्हणजेच शनिवारी ७२.९० कोटी रुपयांची कमाई केली. तर अकराव्या दिवशी रविवारी कमाईचा आकडा ७५ कोटी रुपयांवर पोहोचला. मात्र, दुसऱ्या सोमवारी म्हणजेच बाराव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत काहीशी घट झाली. या दिवशी चित्रपटाने ३२ कोटी रुपयांचा व्यवसाय केला.
सोमवारी कमाई कमी झाली असली, तरी एकूण कलेक्शनच्या बाबतीत चित्रपटाने मोठी मजल मारली आहे. भारतातील चित्रपटाचे एकूण नेट कलेक्शन आता ७९३.०५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
जगभरात १४३७ कोटींची कमाई
‘रामायण’ची जादू केवळ भारतातच नाही, तर परदेशातही पाहायला मिळत आहे. जगभरातील प्रेक्षकांकडून चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, प्रदर्शनाच्या १२ दिवसांत चित्रपटाने जगभरात १ हजार ४३७.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
या कमाईसह जगभरात सर्वाधिक व्यवसाय करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत ‘रामायण’ने पाचवे स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाने यापूर्वीच ‘आरआरआर’ आणि ‘धुरंधर’सारख्या चित्रपटांना जागतिक कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे.
आता या चित्रपटाचे पुढचे लक्ष्य अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’चा विक्रम मोडणे हे आहे. ‘पुष्पा २’ने जगभरात १ हजार ७४२.१० कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. त्यामुळे ‘रामायण’ला हा विक्रम मोडण्यासाठी आणखी सुमारे ३०५ कोटी रुपयांची कमाई करावी लागणार आहे.

Ramayana Box Office Collection Day 12
‘आरआरआर’चा विक्रम मोडला
‘रामायण’ने बाराव्या दिवशी आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. भारतातील नेट कलेक्शनच्या बाबतीत या चित्रपटाने एस. एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ला मागे टाकले आहे.
‘आरआरआर’ने भारतात एकूण ७८२.२० कोटी रुपयांची कमाई केली होती. तर ‘रामायण’चे नेट कलेक्शन आता ७९३.०५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे देशांतर्गत बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने आपली ताकद दाखवून दिली आहे.
याशिवाय दुसऱ्या सोमवारी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतही ‘रामायण’ने दुसरे स्थान मिळवले आहे. भारतातील एकूण कमाईच्या बाबतीत हा चित्रपट सध्या सहाव्या क्रमांकावर आहे. या यादीत ‘धुरंधर’, ‘केजीएफ २’, ‘बाहुबली २’, ‘धुरंधर २’ आणि ‘पुष्पा २’ हे चित्रपट त्याच्या पुढे आहेत.
२००० कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला चित्रपट
‘रामायण’ हा भारतीय महाकाव्य रामायणावर आधारित चित्रपट असून, तो जवळपास २००० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. नितेश तिवारी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. नमित मल्होत्रा हे चित्रपटाचे निर्माते असून, अभिनेता यश सहनिर्माता आहे.
या चित्रपटात रणबीर कपूरने प्रभू श्रीरामांची भूमिका साकारली आहे. साई पल्लवी माता सीतेच्या, तर यश रावणाच्या भूमिकेत दिसत आहे. याशिवाय रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत आहे. लारा दत्ता, रकुल प्रीत सिंह, अरुण गोविल, विवेक ओबेरॉय, शीबा चड्ढा आणि काजल अग्रवाल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
एकीकडे भारतात ‘आरआरआर’चा विक्रम मोडणारा ‘रामायण’ आता जगभरातील कमाईच्या बाबतीत ‘पुष्पा २’च्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे आगामी दिवसांत हा चित्रपट आणखी कोणते विक्रम आपल्या नावावर करणार, याकडे चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.





