माढा : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत भाजपने विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. माजी आमदार राम सातपुते यांनी रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पक्षाकडे केली होती. यानंतर भाजपने मोहिते-पाटील यांना नोटीस बजावली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपल्या कुटुंबाने भाजपविरोधी काम केले आहे. त्यामुळे सात दिवसांत लेखी स्वरूपात आपले स्पष्टीकरण द्यावे, अशी नोटीस भाजप कार्यालयाचे सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्या नावाने निघाली आहे. त्यामुळे रणजितसिंह मोहिते-पाटील नोटिशीला काय उत्तर देतात, याकडे सोलापूर जिल्ह्यासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते-पाटील यांना तिकीट पाहिजे असल्याने त्यांनी भाजपात बंडखोरी केली. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पुन्हा शरद पवार राष्ट्रवादी प्रवेश केला. तेव्हा, रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा प्रचार केला नव्हता. त्यासह विधानसभा निवडणुकीत माळशिरसमधून राम सातपुते यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली होती. मात्र, राम सातपुते यांच्याही प्रचार सभांना रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी हजेरी लावली नव्हती. विधानसभा निवडणुकीत राम सातपुते यांचा उत्तम जानकर यांनी पराभव केला. पराभवाच्या दुसऱ्या दिवशीच राम सातपुते यांनी रणजितसिंह मोहिते-पाटील यांची भाजपच्या वरिष्ठांकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन रणजितसिंह मोहिते-पाटील यांना नोटीस बजावली आहे.