Pune : महापालिका निवडणुकीसाठी भाजपाकडून जोरदार तयारी! स्वबळावर लढणार? शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणतात…

Pune News : गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये पुणे शहराची जबाबदारी पुन्हा एकदा धीरज घाटे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांससमोर ठेवून करण्यात आलेली निवड महत्वाची मानली जात आहे. घाटे यांची पुणे भाजपच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात येत असल्याचे माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले.
कोण किती जागा लढवणार याचा फॉर्म्युला प्रदेश स्तरावर ठरणार असल्याचे धीरज घाटे यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत स्पष्ट केले आहे. तसेच 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत ज्या जागा आम्ही निवडून आलोय त्या सगळ्या लढवणार आहोत, असे देखील घाटे यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी पुण्यात मुक्कामाला होते. महानगरपालिका निवडणुकांची पार्टीने जोरात तयार केली पाहिजे, आपला महापौर महापालिकेत बसला पाहिजे अशा पद्धतीने कामाला लागा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याचे घाटे म्हणाले. त्यानुसार महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.
जागावाटपावरून रस्सीखेच होण्याची शक्यता
महापालिका निवडणूक आगामी चार-पाच महिन्यात होणार असून त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजपकडून देखील तयारी करण्यात आली आहे. मात्र, जागा या महायुती म्हणून लढल्या जाणारी की स्वबळावर याचा ठोस निर्णय अद्याप झालेला नाही. महायुतीमध्ये जागा वाटप हा कळीचा मुद्दा ठरणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजकडून जागा वाटपावरून रस्सीखेच होईल, असे दिसत आहे.
२०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणूक स्वबळावरच लढविण्यात आली होती. यामध्ये १६४ पैकी ९९ जागा भाजपने जिंकल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसने ४२ जागेवर आपल्या उमेदवारांना विजयी केले होते. त्यामुळे क्रमांक दोनचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ठरला होता.
घाटेंच्या शुभेच्छा कार्यक्रमाकडे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची पाठ
भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष धीरज घाटे यांना नियुक्तीपत्र देण्याच्या घरकुल लॉन्समधील कार्यक्रमाकडे नगरसेवक, शहर पदाधिकाऱ्यांंनी पाठ फिरविली. कार्यक्रमाला गर्दीच नसल्याने लॉन्समधील कार्यक्रम गुंडाळून घाटे यांंना पक्ष कार्यालयातच नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम उरकण्यात आला. पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी भाजप प्रयत्नशील असला तरी पक्षातील या नाराजीची कितपत गंभीर दखल घेतली जाते यावर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत.





