Udit Raj : मायावतींच्या बसपावर भाजपचे नियंत्रण; काँग्रेस नेते उदित राज यांची टीका

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे नेते उदित राज यांनी गुरूवारी बसपाच्या प्रमुख मायावती यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. बसपावर सध्या भाजपचे नियंत्रण असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, मायावती यांचे भाचे आकाश आनंद यांना कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली. मायावती यांनी नुकतीच आकाश यांची बसपामधून हकालपट्टी केली. त्याचा संदर्भ घेऊन उदित राज यांनी पत्रकार परिषदेत मायावतींवर निशाणा साधला.
इतर राजकीय पक्षांपेक्षा बसपाचा उदय वेगळ्या स्वरूपाचा आहे. सामाजिक चळवळ म्हणून प्रारंभ करणारा बसपा नंतर राजकीय पक्ष बनला. आता तो पक्ष भाजपमय बनला आहे. आकाश यांची हकालपट्टी करण्याचे आत्मघाती पाऊल मायावती यांनी उचलले. कुठल्या दबावाखाली नसत्या तर त्यांनी ती कृती केली नसती. आकाश यांना दोनवेळा पदांवरून हटवण्यात आले.
बसपाने आगामी निवडणुकांत कॉंग्रेस-सपशी आघाडी करावी. अन्यथा, बसपाचे अस्तित्व उरणार नाही, अशी भूमिका आकाश यांनी मांडली. ती भाजपच्या दृष्टीने त्रासदायक होती. केवळ बसपाचीच मतपेढी भाजप काबीज करू शकतो. मात्र, आकाश बसपामध्ये राहिल्यास ते होणे शक्य नव्हते, असे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीवेळी आकाश यांनी भाजपविरोधात आक्रमक भाषण केले. त्यावेळी त्यांना सर्वप्रथम बसपाच्या पदावरून हटवण्यात आले. बसपा इंडिया आघाडीचा भाग बनला असता; तर भाजपला केंद्रात पुन्हा सरकार स्थापन करणे शक्य झाले नसते, असा दावाही उदित राज यांनी केला.





