भाजप म्हणजे हेट फॅक्टरी, टेक फॉग ऍप हे त्याचेच उदाहरण; राहुल गांधी यांची टीका

नवी दिल्ली, – टेक फॉग नावाच्या नव्या संशयास्पद ऍप वरून कॉंग्रेसने भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भारतीय जनता पक्षाने द्वेष पसरवणाऱ्या अनेक फॅक्टरी उघडल्या आहेत. हे नवीन ऍप हे त्याचेच उदाहरण आहे असे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
देशात इतके द्वेषाचे वातावरण वेगाने का पसरते आहे याविषयी देशाला औत्स्युक्य होते.बुली बाई ऍप निर्माण करून असाच वादंग माजवला गेला. हे ऍप तयार करणारे आरोपी हे युवक आहेत. भाजपच्याच हेट फॅक्टरीचेच हे प्रॉडक्ट आहे असेही राहुल गांधी यांचे म्हणणे आहे.
टेक फॉग या नवीन ऍपद्वारे भाजप कडून आपल्या समर्थकांकरवी द्वेषाचे कसे वातावरण देशात निर्माण केले जात आहे त्या बातमीचे कात्रण राहुल गांधी यांनी ट्विटरवर प्रसारीत केले आहे. कॉंग्रेस पक्षाने या प्रकरणात सरकारकडून उत्तरे मागवली असून सुप्रीम कोर्टानेही यात हस्तक्षेप करण्याची गरज पक्षाने व्यक्त केली आहे. बुली बाई ऍपवर मुस्लिम महिलांचे बोगस फोटो टाकून त्या महिलांचे लिलाव केले जात असल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते.





