11 ग्रामपंचायतींत भाजपचे सर्वाधिक 51 सदस्य

जामखेड / कर्जत – कर्जत-जामखेड मतदारसंघातील 11 ग्रामपंचायतींचे मंगळवारी निकाल लागले. या निकालात 11 पैकी 7 ग्रामपंचायतींवर भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत आमदार रोहित पवार यांना जोर का झटका दिला. आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा कर्जत- जामखेड मतदारसंघातील जनतेने विश्वास दाखवला आहे. आगामी बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निकाल भाजपला पोषक वातावरण तयार करणारा ठरला आहे.
कर्जत-जामखेड मतदार संघातील 11 ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक पार पडली. यामध्ये कर्जत तालुक्यातील 8 तर जामखेड तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींचा समावेश होता. ग्रामपंचायत निवडणुका आगामी बाजार समिती निवडणुकांची लिटमस चाचणी होती. यात पवार बाजी मारणार की शिंदे यावर पुढील रणनिती ठरणार असेच बोलले जात होते. यात आमदार राम शिंदे यांनी बाजी मारली.
कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने 11 पैकी 7 गावांवर कब्जा मिळवला. यामुळे भाजपा आणि मित्रपक्षांचा उत्साह अधिकच दुणावला आहे. राष्ट्रवादीला या निवडणुकीत मिळालेले तुटपुंजे यश आमदार रोहित पवारांना धक्का देणारे ठरले आहे. आमदार राम शिंदे यांची लोकप्रियता अधिक वाढू लागल्याचे या निकालातून स्पष्ट होत आहे.
कर्जत-जामखेड मतदार संघातील राजुरी, रत्नापूर, शिऊर, अळसुंदे, कापरेवाडी, निंबे, कोपर्डी, म्हाळंगी, मुळेवाडी, बहिरोबावाडी, कौडाणे या 11 ग्रामपंचायतींचे निकाल मंगळवारी हाती आले. यामध्ये शिऊर, अळसुंदे, कापरेवाडी, म्हाळंगी, मुळेवाडी, कौडाणे या 6 ठिकाणी भाजपाचे सरपंच पदाचे उमेदवार निवडून आले.
बहिरोबावाडीत भाजप मित्रपक्षाचा सरपंच झाला तर कोपर्डीत अपक्ष सरपंच झाला. राजुरी आणि निंबे गावात सरपंच राष्ट्रवादीचा झाला पण बहुमत भाजपला मिळाले. राष्ट्रवादीचे रत्नापूर, राजुरी आणि निंबे या तीन गावांत सरपंच झाले. रत्नापुरात राष्ट्रवादीला काठावरचे बहुमत आहे.
कर्जत-जामखेड मतदार संघातील 11 ग्रामपंचायतींमध्ये निवडून आलेल्या सदस्यांमध्ये भाजपचाच बोलबाला आहे. मतदारसंघातील 11 ग्रामपंचायतींमध्ये एकूण 95 ग्रामपंचायत सदस्य निवडले जाणार होते. यामध्ये भाजपचे सर्वाधिक 51 सदस्य निवडून आले, तर राष्ट्रवादीचे अवघे 20 सदस्य निवडून आले. तसेच 21 ठिकाणी स्थानिक विकास आघाडी आणि अपक्षांचे एकूण 21 सदस्य निवडून आले. अवघ्या 3 जागांवर कॉंग्रेसचे सदस्य निवडून आले.
रत्नापूर ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काठावर
आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली रत्नापूर, राजुरी आणि निंबे या तीन गावांत राष्ट्रवादीचे सरपंच झाले. परंतु निंबे आणि राजुरीत भाजपाचे बहुमत आहे. एकूणच संपूर्ण मतदारसंघात राष्ट्रवादीला बहुमत असलेली रत्नापूर ग्रामपंचायत जिंकता आली. तेथेही राष्ट्रवादीला काठावरचे बहुमत आहे. एकूणच ग्रामपंचायत निकालातून जनतेने आमदार रोहित पवारांना नाकारल्याचे दिसत आहे.
आ. रोहित पवारांना धक्का
कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने 11 ग्रामपंचायतीपैकी 7 गावांवर कब्जा मिळवला. यामुळे भाजपा आणि मित्रपक्षांचा उत्साह अधिकच दुणावला आहे. राष्ट्रवादीला या निवडणुकीत मिळालेले तुटपुंजे यश आमदार रोहित पवारांना धक्का देणारे ठरले आहे. आमदार राम शिंदे यांची लोकप्रियता अधिक वाढू लागल्याचे या निकालातून स्पष्ट होत आहे.





