दहिवडी – आमची सत्ता असताना शेतकरी सुखी होता. भाजप सरकारने शेतमालावर कर लावला आणि दरही दिला नाही. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या सर्वात जास्त आत्महत्या झाल्या. हे सरकार शेतकऱ्यांचे कर्दनकाळ आहे, अशी घणाघाती टीका शरद पवार यांनी केली. दहिवडी, ता. माण येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्ता संवाद मेळावा शुक्रवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, सारंग पाटील, प्रभाकर देशमुख, सुनील माने, विश्वंभर बाबर आदी उपस्थित होते. शरद पवार म्हणाले, आमचे सहकारी सदाशिवराव पोळ यांच्या पाठीशी तुम्ही ताकद उभी केली होती. यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या पाठीशी माण तालुका कायम राहिला. त्यामुळे इथल्या लोकांच्या पाठीशी राहणे, हे आमचे कर्तव्य आहे. दुष्काळी भागातील शेतकरी अडचणीत आहे. केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात कर बसवला. त्यांना माझे सांगणे आहे की, शरद पवारने कांद्यावर कधीही कर लावला नाही. आम्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून महाराष्ट्रात चांगले सरकार देण्याचा प्रयत्न केला. देशातील वेगवेगळ्या प्रांतांमध्ये महिलांची नग्न धिंड काढली जात आहे. मात्र, केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. नागालॅंड, मणिपूर, सिक्कीम ही राज्ये चीनच्या जवळ आहेत. त्यांच्या सुरक्षेकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष आहे. पक्ष फोडणाऱ्या सरकारविरोधात जनतेने एकत्र येऊन सरकारला जागा दाखवून द्यावी. हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा आहे.जयंत पाटील म्हणाले, पवारसाहेबांना “जाणता राजा’ म्हटले की, अनेकांच्या पोटात दुखते; परंतु केवळ राज्यातील नव्हे, तर देशातील जनतेचे प्रश्न सोडवण्याची त्यांची ताकद आहे. पत्रकारांनी पवारसाहेबांना प्रश्न विचारला होता की, तुमच्याकडे आमदार किती? त्यावेळी ‘शून्य’ असे उत्तर त्यांनी दिले होते. राष्ट्रवादी आणि माझ्यावर प्रेम करणारी जनता सोबत आहे. तीच जनता मला जेवढे आमदार देईल, तेवढे माझे आमदार असतील. किती खोटे बोलावे, हे येथील आमदारांना कळायला हवे. माणला एक आणि खटावला दीड टीएमसी पाणी द्यायचे काम मी केले आहे. त्यासाठी प्रभाकर देशमुख यांनी पाठपुरावा केला. तेच पुढील आमदार असतील. रोहित पवार म्हणाले, केंद्राने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली. पवारसाहेबांनी तरी असा निर्णय घेतला होता का, असा प्रश्न विरोधकांनी विचारला होता. त्यांना सांगा की, पवारसाहेबांनी तशी वेळच येऊ दिली नाही. आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, प्रत्येक ठिकाणी तोडफोडीचे राजकारण भाजपकडून केले जात आहे. दुष्काळाच्या सावटातही आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, या सभेला जाऊ नये म्हणून दबाव होता; परंतु पवारसाहेबांवर प्रेम करणारे असल्याने, आम्हाला कोणीही अडवू शकत नाही. दहिवडी नगरपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन भाजपने श्रेयवादातून तृतीयपंथीयाच्या हस्ते केले. त्यांना हे माहीत नसेल की, तृतीयपंथीयांची पहिली संघटना सुप्रिया सुळे यांच्यामुळे उभी राहिली. त्यामुळे तृतीयपंथी रवी जाधव यांचा राष्ट्रवादीलाच पाठिंबा आहे. ते उद्घाटन आमच्याच पक्षाने केले, असे मी समजतो. मेळाव्याचे आयोजक प्रभाकर देशमुख म्हणाले, माण-खटावमधील जनता दुष्काळाने होरपळत आहे. जनावरे विकायची वेळ शेतकऱ्यावर आली, तरी सरकारने चारा छावणीसंदर्भात भूमिका घेतलेली नाही. येथील आमदारांनी माण-खटावसाठी एक टीएमसीदेखील पाणी आरक्षित केले नाही. मागील दुष्काळात चारा छावण्यांसाठी आम्ही प्रयत्न केले. चारा छावण्यांमुळे शेतकरी सुखी झाला; परंतु सरकार बदलले आणि चारा छावणीचालकांची बिले येथील आमदारांनी रखडवली. जनता तुमच्याकडे अपेक्षेने बघत असताना, राजकारण करू नका.