Satara: मित्रपक्षांकडूनच भाजपला दणका
Satara जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष निवडला जाईल, अशी भूमिका ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी यापूर्वी मांडली होती. मात्र, प्रत्यक्ष निवड प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्रितपणे बाजी मारली. त्यामुळे भाजपच्या राजकीय अपेक्षांना धक्का बसला. जिल्हा परिषद निवडणुकीतील राजकीय संघर्षाचे पडसाद जिल्हा बँकेच्या सत्तावाटपात उमटल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Satara: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्ताकारणात महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्रित खेळी करत भाजपला जोरदार दणका दिला. बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयसिंह पाटील उंडाळकर, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे दीपक चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. जिल्हा बँकेच्या सत्तेच्या चाव्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपल्याकडे ठेवल्या. जिल्हा बँकेच्या सत्तास्थानी प्रवेश करण्याचा मनसुबा मित्रपक्षांनी उधळून लावत जिल्हा परिषदेतील नाट्याचा वचपा काढला. त्यामुळे महायुतीअंतर्गत मतभेद आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणावर परिणामकारक ठरणार आहे.
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष निवडला जाईल, अशी भूमिका ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी यापूर्वी मांडली होती. मात्र, प्रत्यक्ष निवड प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्रितपणे बाजी मारली. त्यामुळे भाजपच्या राजकीय अपेक्षांना धक्का बसला. जिल्हा परिषद निवडणुकीतील राजकीय संघर्षाचे पडसाद जिल्हा बँकेच्या सत्तावाटपात उमटल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. जिल्हा बँकेच्या सभागृहात बुधवारी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा झाली. निवडणूक निर्णय अधिकारी संजय सुद्रिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला सर्व २१ संचालक उपस्थित होते. अध्यक्षपदासाठी उदयसिंह उंडाळकर आणि उपाध्यक्षपदासाठी दीपक चव्हाण यांचे प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडीनंतर संचालकांनी बाके वाजवून स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बँकेबाहेर फटाके फोडून जल्लोष केला.
या संपूर्ण राजकीय घडामोडीत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई आणि ज्येष्ठ नेते रामराजे नाईक- निंबाळकर यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी देसाई यांची मरळी येथील कारखान्यावर जाऊन भेट घेतल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आल्याचे सांगितले जाते. त्यातूनच अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणि उपाध्यक्षपद शिवसेनेकडे देण्याचे समीकरण प्रत्यक्षात आले.
सर्व प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी निवडीनंतर सांगितले. दोनच पदे असल्याने महायुतीतील दोन पक्षांना संधी मिळाली, यात राजकारण शोधण्याचे कारण नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. मात्र, भाजपला या सत्तावाटपात स्थान न मिळाल्याने त्यांच्या स्पष्टीकरणापेक्षा राजकीय संदेशाचीच चर्चा अधिक होत आहे.
सर्वांना सोबत घेऊन बँकेची परंपरा जपणार
– उदयसिंह पाटील उंडाळकर (नवनिर्वाचित अध्यक्ष)
कै. विलासकाका उंडाळकर यांच्या सहकार परंपरेचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आता उदयसिंह उंडाळकर यांच्यावर आली आहे. निवडीनंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह महायुतीतील वरिष्ठ नेत्यांच्या शुभेच्छांचा उल्लेख केला. जिल्हा बँकेला आर्थिक सक्षमतेची आणि सहकार क्षेत्रातील साक्षरतेची मोठी परंपरा आहे. सर्व संचालक आणि सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन ही परंपरा अधिक जबाबदारीने पुढे नेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी काळात बँकेच्या आर्थिक धोरणांना आणि कारभाराला कोणती दिशा मिळते, याकडे लक्ष लागले आहे.
शेतकरी सभासदांचे हित केंद्रस्थानी
– दीपक चव्हाण (नवनिर्वाचित उपाध्यक्ष)
जिल्हा बँकेची सहकार परंपरा कायम राखणे, कर्मचारी आणि शेतकरी सभासदांचे हित जपणे हेच प्रमुख कर्तव्य असल्याचे दीपक चव्हाण यांनी सांगितले. बँकेची आर्थिक सुदृढता भविष्यात अधिक वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील. धोरणात्मक निर्णय घेताना महायुतीतील सर्व सदस्यांना सोबत घेऊनच पुढील वाटचाल केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मात्र, सत्तावाटपात भाजपला बाजूला ठेवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व घटकांना सोबत घेण्याचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.
सत्तेत असूनही भाजप सत्तेच्या वर्तुळाबाहेर
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर भाजपचा दावा असताना प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने सत्ता वाटून घेतली. त्यामुळे भाजपच्या गोटात नाराजी असल्याचे स्पष्ट संकेत निवडीनंतर दिसून आले. विशेष म्हणजे, मंत्री जयकुमार गोरे यांनी यापूर्वी अध्यक्षपद भाजपकडे येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, प्रत्यक्ष निवडीत भाजपला संधी मिळाली नाही. महायुतीतील अंतर्गत समन्वयाचा अभाव की पडद्यामागील राजकीय रणनीती, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
‘आगे आगे देखो, होता है क्या’
– जयकुमार गोरे(ग्रामीण विकास मंत्री)
अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड झाल्यानंतर जयकुमार गोरे यांनी दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. मात्र, पत्रकारांशी बोलताना त्यांच्या प्रतिक्रियेतून नाराजीचे संकेत मिळाले. ‘जिल्हा बँकेचा अध्यक्ष भाजपचा व्हावा, अशी अपेक्षा भाजपचा सदस्य म्हणून व्यक्त करणे चुकीचे नाही. पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकारी म्हणून जिल्हा बँकेच्या सदस्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. महायुतीच्या बैठकीत किंवा अध्यक्ष निवडीच्या निर्णयप्रक्रियेत आपण सहभागी नव्हतो. या प्रक्रियेची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे होती, असेही त्यांनी सांगितले. अडीच वर्षांच्या अध्यक्षपदाच्या सूत्राबाबत विचारले असता, त्याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी, ‘जिल्हा बँकेची निवडणूक झाली म्हणजे सगळे संपले असे नाही. आगे आगे देखो, होता है क्या’ असे सूचक विधान त्यांनी केले.
अडीच वर्षांचा फॉर्म्युला की पाच वर्षांची सत्ता?
अध्यक्षपदाचा कार्यकाळ दोन- दोन- एक की अडीच वर्षांचा राहणार की संपूर्ण पाच वर्षांचा, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. वरिष्ठ पातळीवर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. त्यामुळे सध्याची बिनविरोध निवड म्हणजे पाच वर्षांच्या सत्तेचा निर्विवाद निर्णय आहे की भविष्यातील सत्तावाटपाची केवळ पहिली खेळी, हा प्रश्न कायम आहे.
युतीअंतर्गत मतभेदांना नवी धार
जिल्हा बँकेच्या निवडीत राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेने एकत्र येत भाजपला बाजूला ठेवले. वरकरणी महायुतीतील दोन पक्षांना पदे मिळाल्याचे समाधान व्यक्त होत असले, तरी या निवडीने जिल्ह्यातील महायुतीच्या राजकारणातील अंतर्गत मतभेदांना नवी धार दिली आहे. आता भाजप या राजकीय धक्क्याला आगामी जिल्हा राजकारणात कसे उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





