नितीश कुमार यांच्यासाठी भाजपचे दरवाजे कायमचे बंद – सुशीलकुमार मोदी

पाटणा – भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी (Sushil Kumar Modi) यांनी सोमवारी पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्यावर निशाणा साधला. नितीश यांच्यासाठी भाजपचे दरवाजे कायमचे बंद झाले असल्याचा दावा त्यांनी केला.
नितीश यांनी याआधीही राजदशी आघाडी करून 20 महिने सरकार चालवले. मात्र, त्या कार्यकाळात नितीश यांची घुसमट झाली. तशीच भावना त्यांच्यात पुन्हा जागृत होईल. पण, यावेळी भाजप मित्र म्हणून नितीश यांचा स्वीकार करणार नाही, असे सुशील यांनी म्हटले.
नितीश यांच्या जेडीयूने काही दिवसांपूर्वी भाजपबरोबरची मैत्री तोडली. त्यामुळे भाजपला बिहारमधील सत्तेतून बाहेर जावे लागले. त्यानंतर जेडीयूने राजद, कॉंग्रेस आणि इतर पक्षांना बरोबर घेऊन महाआघाडी सरकार स्थापन केले. त्या सत्ताबदलानंतर माजी उपमुख्यमंत्री असणारे सुशील सातत्याने नितीश यांच्यावर टीकेची झोड उठवत आहेत. अर्थात, मिश्कील प्रतिक्रिया देऊन नितीश यांनी सुशील यांच्या टीकेची खिल्ली उडवण्याचे तंत्र अवलंबले आहे.
काही काळापासून सुशील भाजपमध्ये दुर्लक्षिले जात आहेत. त्यामुळे एखादे पद पदरात पाडून घेण्यासाठी ते माझ्यावर टीका करत असावेत, अशा आशयाची प्रतिक्रिया नितीश यांनी याआधी काही वेळा दिली.





