पुण्यात पुन्हा भाजपचा दबदबा

पुणे – विधानसभा निवडणुकीत पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत महाविकास आघाडीला धक्का देत महायुतीने सात जागांवर विजय मिळविला आहे, तर महाविकास आघाडीला अवघी एक जागा मिळाली आहे.
पर्वती मतदारसंघातून भाजप आमदार माधुरी मिसाळ आणि खडकवासला मतदारसंघातून आमदार भीमराव तापकीर हे चौथ्यांदा विजयी झाले. त्याचबरोबर कोथरूडमधून सर्वाधिक १ लाख १२ हजार ४१ मतांचे मताधिक्य आमदार चंद्रकांत पाटील यांना मिळाले असून, त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांचा पराभव केला आहे.
शिवाजीनगर मतदारसंघातून सिद्धार्थ शिरोळे आणि कॅन्टोन्मेंटमधून सुनील कांबळे आणि हडपसरमधून चेतन तुपे सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत, तर दीड वर्षांपूर्वी कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेले काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांंचा हेमंत रासने यांनी पराभव केला असून, वडगावशेरीतील राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील टिंगरे यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बापूसाहेब पठारे यांनी पराभव केला आहे.
पुण्यातील आठही मतदारसंघांची मतमोजणी शनिवारी (दि. २३) कोरेगाव पार्क येथील शासकीय धान्य गोदामात पार पडली, मागील निवडणुकीच्या तुलनेत पुण्यात जवळपास १३ टक्के मतदान वाढल्याने निकालांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मतमोजणी सुरू झाल्यानंतर खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सचिन दोडके, कसब्यात रवींद्र धंगेकर आघाडीवर होते. मात्र, दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीपासून महायुतीच्या सर्वच उमेदवारांना मोठी आघाडी मिळाली.
हडपसर, वडगावशेरीत चुरस
पुण्यात हडपसर आणि वडगावशेरी विधानसभा मतदारसंघांत मोठी चुरस पाहायला मिळाली. मतमोजणीच्या सुरुवातीनंतर हडपसरमधून राष्ट्रवादीचे चेतन तुपे आणि वडगावशेरीमधून सुनील टिंगरे शेवटच्या पाच ते सहा फेऱ्यांपर्यंत आघाडीवर होते. मात्र, शेवटच्या टप्प्यात या दोन्ही उमेदवारांचे मताधिक्य कमालीचे घटले. त्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बापूसाहेब पठारे अवघ्या ४ हजार ७१० मतांनी निवडून आले. हडपसरमधून चेतन तुपे ७ हजार १२२ मतांनी निवडून आले आहेत.




