भाजपची पहिली यादी समोर येताच पक्षात बंडाचे निशाण ; पाचपुते दाम्पत्य फडणवीसांच्या बंगल्यावर दाखल , पुण्यातही बंडाची भाषा

BJP Candidate List । राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भाजपने काल आपली पहिली 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत बऱ्यापैकी जुन्या नेतेमंडळींना कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आता पक्षात बंडाचे निशाण फडकत असल्याचे दिसत आहे.
भाजपमध्ये बंडखोरीचे पहिले निशाण श्रीगोंद्यातून फडकले आहे. कारण या ठिकाणावरून भाजपने विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, या मतदारसंघातून भाजपच्या जुन्या पदाधिकारी सुवर्णा पाचपुते यादेखील इच्छूक होत्या. त्यामुळे प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर होताच सुवर्णा पाचपुते यांच्याकडून बंडाचा इशारा देण्यात आला आहे. भाजपने पुन्हा पाचपुते कुटुंबीयांनाच तिकीट दिल्याने त्या प्रचंड नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.
मला तिकीट नको पण माझ्या मुलाला पक्षाने तिकीट द्यावे BJP Candidate List ।
तर दुसरीकडे बबनराव पाचपुते आपल्या पत्नीसह देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झाले आहेत. बबनराव पाचपुते आणि प्रतिभा पाचपुते हे दोघेही त्यांचा मुलगा विक्रमसिंह पाचपुते यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रही होते. मात्र, भाजपने प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर केली.यावेळी प्रतिभा पाचपुते यांनी मला तिकीट नको पण माझ्या मुलाला पक्षाने तिकीट द्यावे अशी मागणी केली असल्याचे बोलले जात आहे.
सुवर्णा पाचपुतेंना अश्रू अनावर BJP Candidate List ।
भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच अनेक विधानसभा मतदारसंघात नाराजीचा सूर ऐकायला मिळाला. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक असलेल्या सुवर्णा पाचपुते यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून भाजपने उमेदवारी न देता बाहेरून पक्षात आलेल्या प्रस्थापितांनाच पक्ष उमेदवारी देत आहे. पक्ष धृतराष्ट्रासारखा झाला आहे, असं म्हणत पाचपुते यांनी पक्षावर जोरदार टीका केली. सोबतच सुवर्णा पाचपुते यांनी आपल्या कार्यालयातील भाजप नेत्यांचे फोटो आणि चिन्ह हटवले आहे. मात्र, भाजपचे चिन्ह कार्यालयातून हटवताना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले. त्यासोबतच पक्षाला माझी ताकद दाखवून देण्यासाठी मी अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे आता भाजप त्यांची मनधरणी करणार का, हे पाहावे लागेल.
पुण्यातही भाजपमध्ये बंडखोरी
पुण्यात अमोल बालवडकर आणि श्रीनाथ भिमाले यांचे बंडखोरीचे संकेत. अमोल बालवडकर हे कोथरूड मधून इच्छुक आहेत आणि तसा त्यांनी कार्यक्रमाचा सपाटा देखील लावला होता. त्यासोबतच श्रीनाथ भिमाले हे पर्वती मतदारसंघातून इच्छूक होते. त्यांनीदेखील आमची भूमिका स्पष्ट करु, असं सांगितलं आहे. त्यामुळे आता हे बंडखोर भाजपला जड ठरणार का ? हे पाहणे गरजेचे आहे.
हेही वाचा
विदर्भाबाबत काँग्रेस – ठाकरे गटात तिढा ? ; ‘या’ 12 जागांवर चर्चांवर असहमती कायम ?





