“शिंदे सरकार स्थापन करण्यात माझं मोठं योगदान”, ‘या’ भाजप आमदाराने केला मोठा दावा

चंद्रपूर : राज्यात सध्या विधानसभेचे वारे जोरदार वाहू लागले आहे. अनेक मोठे नेते आपल्या पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचारसभा घेताना दिसत आहेत. चंद्रपुरात महायुतीची जाहीर सभा पार पडली. यावेळी महायुतीचे चंद्रपूर विधानसभा निवडणुकीचे उमेदवार किशोर जोरगेवार यांनी भाषणादरम्यान एक मोठा खुलासा केला आहे.
काय म्हणाले किशोर जोरगेवार ?
भाजपचे विद्यमान आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपुरातून पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. “मी 2019 ला निवडून आलो. त्यावेळी मला देवेंद्र फडणवीस यांनी मला भक्कम पाठिंबा दिला होता. सरकार आले, दीड दिवस राहिले. पण यानंतरही मी सोबत राहिलो. देवेंद्र फडणवीसांनी मोठा त्याग करत एकनाथ शिंदे यांना संधी दिली. त्यांनी जनहिताचे काम केले. शिंदे सरकार स्थापन करण्यात माझं योगदान आहे”, असे किशोर जोरगेवार म्हणाले.
फडणवीसांबाबत केले मोठे भाष्य
“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमचे प्रेरणास्त्रोत आहे. त्यांच्या मनात चंद्रपूरविषयी विकासाच्या वेगवेगळ्या कल्पना आहेत. त्यांना महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळो हीच माझी इच्छा आहे”, असे किशोर जोरगेवार म्हणाले.





