Nainar Nagendran : भाजपकडून तमिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आमदार नयनार नागेंद्रन यांची नियुक्ती

चेन्नई : भाजपने तमिळनाडूतील प्रदेशाध्यक्ष म्हणून आमदार नयनार नागेंद्रन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. ते ८ वर्षांपूर्वी अण्णाद्रमुकला रामराम ठोकून भाजपमध्ये दाखल झाले. आता त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यातून भाजपची भिस्त तमिळनाडूतही बाहेरील नेत्यावर राहणार असल्याचे स्पष्ट झाले.
तमिळनाडूतील विधानसभा निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली आहे. अशात भाजपने प्रदेशाध्यक्ष बदलाचे पाऊल उचलले. त्या राज्याचे माजी मंत्री असणाऱ्या ६४ वर्षीय नागेंद्रन यांच्यावर पक्षाने विश्वास दर्शवला. ते तिसऱ्यांदा आमदार बनले आहेत. याआधी दोनवेळा ते अण्णाद्रमुकच्या तिकिटावर विधानसभेवर निवडून गेले. माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले.
मात्र, जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुकमध्ये दुर्लक्षित केले जात असल्यावरून ते नाराज झाले. त्यातून त्यांनी २०१७ यावर्षी भाजपमध्ये प्रवेश केला. आता पुढील वर्षीच्या निवडणुकीत ते पक्षाची धुरा सांभाळतील. त्या निवडणुकीत पक्षाची कामगिरी चांगली होण्याच्या उद्देशातून त्यांना राजकीय कसब पणाला लावावे लागेल. विविध राज्यांत राजकीय प्रभाव वाढवण्यासाठी भाजपने इतर पक्षांतून आलेल्या नेत्यांना सन्मानजनक पदे दिली. तसेच धोरण त्या पक्षाने तमिळनाडूतही अवलंबलेले दिसते.





