Pune Crime : पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीमागं भाजप अन् राष्ट्रवादीचा हात; ‘या’ नेत्याच्या दाव्यानं खळबळ

अकोला : मराठवाड्यातील बीडप्रमाणे आता पुण्यातही गुन्हेगारी उफाळून आली असून, याला जबाबदार भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा हात असल्याचा धक्कादायक दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. सोमवारी (दि. ६) विदर्भातील अकोला येथे मीडियाशी बोलताना सपकाळ यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांवर थेट आरोप करत राजकीय वातावरण हादरवून टाकलं.
पुण्याच्या गुन्हेगारीचं कंट्रोल कोणाकडे?
सपकाळ म्हणाले, “पुण्याच्या ससून रुग्णालयात ड्रग्स विकणाऱ्याला कोणी पाठिंबा देतंय? हे महाराष्ट्रासमोर उघड आहे. पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि कोयता गँगच्या पाठीमागे कोणता ‘दादा’ आहे? हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करावं.” त्यांनी स्पष्ट केलं की, पुण्यातील गुन्हेगारीला भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी जबाबदार आहे.
धंगेकरांच्या गौतमी पाटील प्रकरणातील आरोपांनी आमच्या या दाव्याला बळ मिळालं आहे. भाजप-एनसीपीच्या सत्ताकारभारात गुन्हेगारीचा उद्रेक झाला असून, पोलिस वर्दीला अपवाद ठरलेल्या घटनांनी हे सिद्ध केलंय. पूर्वी पुणे ‘शांत, सुरक्षित आणि विद्येचं माहेरघर’ म्हणून ओळखलं जायचं, आता मात्र ते बदललंय, असंही सपकाळ म्हणाले.
शिंदेंचं मोठेपण होऊ नये म्हणून शिधा योजना बंद
सपकाळ यांनी महायुती सरकारमधील अंतर्गत कलहावरही टीका केली. ते म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंचं मोठेपण होऊ नये म्हणून आनंदाचा शिधा योजना बंद केली. यानंतर लाडकी बहीण योजनेलाही धक्का बसणार आहे.” हे विधान महायुतीतील वादाला नवं वळण देणारं असून, राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलंय.
‘वोट चोर, गद्दी छोड’चा नारा घुमेल
अकोल्या दौऱ्यात सपकाळ यांनी आगामी बिहार विधानसभा निवडणुकीवरही थेट भाष्य केलं. “राहुल गांधींच्या बिहार जनता यात्रेला अलोट प्रतिसाद मिळत आहे. ‘वोट चोर, गद्दी छोड’ हा नारा बिहारमध्ये प्रभावीपणे काम करेल आणि मोठं जनआंदोलन उभं राहील. भाजपला पळता भुई थोडी होईल,” असा दावा त्यांनी केला. हे विधान महाराष्ट्रातील राजकारणापासून बिहारपर्यंत काँग्रेसच्या आक्रमक रणनीतीचं संकेत देतंय.





