Bishnoi Gang Pune: पुण्यात बिष्णोई टोळीचा हैदोस! कापड व्यापाऱ्याकडे केली २ कोटींची मागणी; आठवड्यातील तिसरी घटना
Bishnoi Gang Pune: वानवडीत स्टील उद्योगपतीवर गोळीबार आणि वडकीच्या औषध विक्रेत्यानंतर पुण्यात आठवड्यातील तिसरी घटना; पोलीस यंत्रणा सतर्क.

Bishnoi Gang Pune – कुख्यात बिष्णोई टोळीच्या नावाने खंडणी मागण्याच्या घटना सुरूच असून, आता उत्तमनगरमधील एका कापड व्यापाऱ्याला २ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, गुन्हा शाखा तपास करत आहे. बिष्णोई टोळीने खंडणीसाठी धमकी मागण्याची आठवड्यातील तिसरी घटना असून यामुळे व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण आहे.
तक्रारदारांचे ( ४७) उत्तमनगरात कापडाचे दुकान असून ते त्यांचा बांधकाम व्यवसायही आहे. त्यांचे कार्यालय नर्हे येथे असून शनिवारी सकाळी इंटरनेट-कॉलवर त्यांना धमकीचा फोन आला. त्याने आपली ओळख शुभम लोणकर अशी करून दिली. तक्रारदार उत्तमनगर-शिवणे मर्चंट्स असोसिएशनचे पदाधिकारी असल्याचे सांगताना त्याने त्यांचा बांधकाम व्यवसाय, कारचा नोंदणी क्रमांक तसेच दैनंदिन हालचालींची माहिती असल्याचा दावा केला.
याचवेळी कुटुंबातील सदस्यांची माहिती असल्याचे सांगत स्वतःची काळजी घ्या, असा इशारा देत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर २ कोटी तयार ठेवण्यास सांगून पुढील सूचना लवकरच देऊ, असे बजावले. यानंतर तक्रारदारांनी तत्काळ उत्तमनगर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून तक्रारदारांचे दुकान, निवासस्थान, नर्हेतील बांधकाम कंपनीचे कार्यालयाची सुरक्षा वाढविली आहे. उत्तमनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर गुन्हे शाखा सखोल करत असल्याचे सांगितले.
आठवड्यातील तिसरी घटना
आठवड्यात पुण्यात बिष्णोई टोळीने खंडणी मागण्याच्या ही तिसरी घटना आहे. २२ जून रोजी वानवडी परिसरातील एका स्टील उद्योगपतीकडे ५० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. त्यानंतर मांतरवाडी येथील त्यांच्या कारखान्यावर गोळीबार केला होता. २३ जून रोजी वडकी येथील औषध घाऊक विक्रेत्याकडे २ कोटींची खंडणी मागण्यात आली होती.
गुरुवारी रावेतला एका महिलेने दुबईस्थित पतीकडे टोळीने ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे दाखल केली होती.सलग घडणाऱ्या या घटनांमुळे व्यापारी व उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिष्णोई टोळीच्या नावाने येणाऱ्या कॉलचा तपास वेगाने सुरू आहे.






