“वाढदिवसाला शुभेच्छा नाही तर शोक व्यक्त केला पाहिजे,” नीना गुप्ता यांचे विधान चर्चेत

मुंबई – बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता या नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिल्या आहेत. 4 जून रोजी त्यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्त त्यांची मुलगी मसाबाने नीना गुप्ता यांचा खास व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याऐवजी शोक व्यक्त केला पाहिजे’, असे म्हंटले आहे. सध्या त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे.
यावेळी मसाबाने नीना गुप्ता यांना वाढदिवसानिमित्त खास प्रिंटेड जॅकेट गिफ्ट दिले आहे. त्यानंतर त्या व्हिडिओमध्ये म्हणतात की, हो, माझा वाढदिवस आहे! माझ्या वाढदिवशी दिलेल्या भेटवस्तूबद्दल धन्यवाद. मला असे वाटते की 60 वर्षांनंतर वाढदिवस आला की लोकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याऐवजी शोक व्यक्त केला पाहिजे कारण आता जगण्याचे वय कमी होत आहे. मी घरी चांगले पदार्थ खाऊन वाढदिवस साजरा करणार आहे.’ या व्हिडीओला मसाबाने ‘आज नीनाजींचा वाढदिवस आहे. सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा द्या,’ असे कॅप्शन दिले आहे.
View this post on Instagram
नीना गुप्ता यांनी जाने भी दो यारो, खलनायक, बधाई दो, छोकरी, गुड बाय आणि ऊंचाई या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी पंचायत, मसाबा मसाबा आणि पंचायत 2 या ओटीटीवरील वेब सीरिजमध्ये देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. लवकरच ‘पंचायत 3’देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पंचायत’ मधील नीना गुप्ता यांची मंजू देवी ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली आहे.





