Bilawal Bhutto : बिलावल भुट्टो यांचा सूर नरमला; भारताला केले चर्चेचे आवाहन

इस्लामाबाद : बाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी मंगळवारी भारताला चर्चेसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. जर भारताला शांतता हवी असेल, तर त्याने मुठी आवळून नव्हे तर उघड्या हातांनी पुढे यावे, असे ते म्हणाले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही शेजाऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या संसदेत सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केले. प्रादेशिक सुरक्षिततेच्या मुद्द्यावर हे अधिवेशन बोलावण्यात आले आहे.
बिलावल यांनी भारत आणि पाकिस्तान दोघांनाही एकत्र काम करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी भारताला निष्पक्ष चौकशीचे आव्हान दिले आहे. हे एकत्र काम करण्याची सुरुवात आहे. भारताने पाकिस्तानचा हबहा प्रस्ताव स्वीकारायला हवा, असल्याचे देखील भुट्टो यांनी म्हटले आहे.जर भारताला शांततेच्या मार्गावर चालायचे असेल, तर त्यांनी हात उघडे ठेवून यावे, मुठी आवळून नाही. आपण एकमेकांच्या शेजारी म्हणून बसून सत्य बोलूया, असे ते म्हणाले.
जर भारताला सांतता नको असेल, तर पाकिस्तानची जनता गुडघ्यांवर झुकणारी नाही, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. पाकिस्तान स्वातंत्र्यासाठी युद्ध करायला तयार आहे केवळ संघर्षासाठी युद्ध करायला तयार नाही. त्यामुळे संवाद करायचा का विनाश करायचा याचा निर्णय भारताला घ्यायचा आहे, असेही भुट्टो म्हणाले.
दहशतवादाचा पराभव बळाने होत नाही, दहशतवादाला केवळ रणगाड्याने पराभूत करता येत नाही. त्याला न्यायाने पराभूत केले पाहिजे. गोळ्यांनी ते उपटून टाकता येत नाही, दहशतवाद आसावादाने नि:शस्त्र केला पाहिजे. राष्ट्रांना राक्षसी बनवून दहशतवाद पराभूत करता येत नाही तर त्याला जन्म देणाऱ्या तक्रारींचे निराकरण करून त्याला पराभूत केले जाऊ शकते, असे ज्ञान देखील बिलावल भुट्टो यांनी पाजळले. गेल्या आठवड्यात, भारताने पाकिस्तानविरुद्ध सिंधू जल करार निलंबित केल्यानंतर बिलावल यांनी पाण्याच्या मुद्द्यावर रक्तपाताचा इशारा दिला होता.





