बिलावल भुट्टो यांना झाली उपरती ; मोठे खुलासे करत म्हणाले,”पाकिस्तानने आतापर्यंत दहशतवादात”

Bilawal Bhutto। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर झालेल्या लष्करी संघर्षामुळे भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण अवस्थेतून जात आहेत. दरम्यान, पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पीपीपी अध्यक्ष बिलावल भुट्टो-झरदारी यांची एक मुलाखत समोर आली आहे. मुलाखतीदरम्यान भुट्टो-झरदारी यांनी,”पाकिस्तानी गट भूतकाळात भारताविरुद्ध दहशतवादात सहभागी होते” अशी कबुलीच दिली आहे. परंतु हे करत असताना त्यांनी पाकिस्तानचा त्यात थेट सहभाग असल्याचे मान्य करण्यास नकार दिला.
बिलावल भुट्टो यांनी दावा केला की पाकिस्तान आता बदलला आहे आणि सरकारने दहशतवादी संघटनांविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर लगेचच या संघटनेने जबाबदारी स्वीकारली असली तरी, टीआरएफबद्दलच्या प्रश्नांवर ते मौन राहिले. इतकेच नाही तर, चीनच्या मदतीने असो वा थेट, संयुक्त राष्ट्रांमध्ये टीआरएफला दहशतवादी संघटना घोषित करण्याच्या प्रक्रियेतही पाकिस्तानने अडथळा आणला.
बिलावल भुट्टो यांनी मुलाखतीत, “पाकिस्तान कधीही जाणूनबुजून देशाच्या आत किंवा बाहेर दहशतवादी हल्ल्यांना परवानगी देत नाही.” असे म्हटले. पुढे ते म्हणाले की,”पाकिस्तानने आतापर्यंत दहशतवादात 92,000 हून अधिक लोक गमावले आहेत. तसेच गेल्या वर्षीच वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 1,200 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ” अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. भुट्टो यांनी याला पाकिस्तानचे सर्वात मोठे अंतर्गत युद्ध म्हटले. त्यासोबतच “ते स्वतः दहशतवादाचे बळी राहिले आहेत, म्हणून त्यांना पीडितांचे दुःख समजते. त्यांनी पाकिस्तानला दहशतवादाने ग्रस्त देश म्हणून वर्णन केले.”
बिलावल भुट्टो यांना विचारले जाणारे तीव्र प्रश्न Bilawal Bhutto।
मुलाखतीत बिलावल भुट्टो यांना विचारण्यात आले की,”तुमच्या देशाचे माजी लष्करप्रमुख आणि राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी २५ ऑक्टोबर २०१५ रोजी पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीवर,”आम्ही लष्कर-ए-तोयबाला पाठिंबा दिला होता आणि त्यांना काश्मीरमध्ये लढण्यासाठी प्रशिक्षण दिले होते. हाफिज सईद आणि लख्वी आमचे नायक होते. त्यानंतर बरोबर चार महिन्यांनी, ११ फेब्रुवारी २०१६ रोजी त्यांनी भारताला तेच सांगितले की,” इंटरसर्व्हिसेस इंटेलिजेंसने जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाला प्रशिक्षण दिले आहे. ” यावर तुमचं मत काय आहे असे विचारले गेले. या प्रश्नाच्या उत्तरात बिलावल म्हणाले की,”मी फक्त एवढेच म्हणेन की आपल्या देशात लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद हे दहशतवादी गट मानले जातात. मात्र, ९/११ नंतर दहशतवादी हा शब्द देखील अशा गटांसाठी वापरला जाऊ लागला. त्यापूर्वी अशा गटांना स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या सैनिकांचे गट मानले जात असे.” असे म्हणत त्यांनी यावर सारवासारव केली.
भारत सरकारची भूमिका
भारत सरकारने स्पष्ट केले आहे की,”कोणत्याही स्वरूपात दहशतवाद सहन केला जाणार नाही आणि पाकिस्तानला त्याच्या राज्य पुरस्कृत दहशतवादासाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर जबाबदार धरले जाईल. भारत सतत पाकिस्तानकडे २६/११, पुलवामा आणि आता पहलगाम सारख्या हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या संघटना आणि व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी करत आहे, परंतु प्रत्येक वेळी पाकिस्तान विधाने करून आपली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करतो.
बिलावल भुट्टो झरदारी यांची मोठी ऑफर Bilawal Bhutto।
बिलावल भुट्टो झरदारी म्हणतात की पाकिस्तान कधीही दहशतवादाचे समर्थन करत नाही. अलिकडेच एका मुलाखतीत त्यांनी भारतातील सर्वात मोठे दहशतवादी मसूद अझहर आणि हाफिज सईद यांच्याबद्दल मोठे विधान केले. त्यांनी भारताला ऑफर दिली की ते दहशतवाद्यांना त्यांच्या स्वाधीन करतील, परंतु त्यापूर्वी त्यांनी एकत्र बोलले पाहिजे. त्यांनी असेही म्हटले की हाफिज सईद सध्या तुरुंगात आहे आणि मसूद अझहर पाकिस्तानमध्ये नाही तर अफगाणिस्तानात लपला आहे.”





