India vs Germany Hockey Match : भारतीय पुरुष हॉकी संघ आणि जर्मनी पुरुष हॉकी संघ यांच्यात दोन सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी दिल्लीत पार पडला. या सामन्यात भारताला जर्मनीविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. यासह जर्मनीने भारताचा 0-2 असा पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला हा सामना वाईट पद्धतीने गमवावा लागला. पॅरिस ऑलिम्पिकनंतर प्रथमच दोन्ही संघ आमनेसामने आले होते. मात्र हा सामना जर्मनीने जिंकला. दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. विशेष म्हणजे या मैदानावर भारतीय संघ 11 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळला. पण संघाच्या हाती निराशा लागली. भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात जर्मनीने दोन शानदार गोल केले. जर्मनीसाठी विंडफेडर आणि मेर्टजेन्स यांनी प्रत्येकी एक गोल केला आणि ते विजयाचे शिल्पकार ठरले. मालिकेतील दुसरा सामना 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यापूर्वी पॅरिस ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जर्मनीने भारताचा पराभव केला होता त्यामुळे भारताला अंतिम फेरीत प्रवेश करता आला नाही. तथापी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. सामन्यातील पहिला गोल हेन्रिक मेर्टजेन्सने चौथ्या मिनिटाला केला, तर 30व्या मिनिटाला कर्णधार लुकास विंडफेडरने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. जर्मनीने शेवटपर्यंत आघाडी कायम ठेवली आणि सामना 2-0 ने जिंकला. 2014 नंतर दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर खेळला जाणारा हा पहिला आंतरराष्ट्रीय हॉकी सामना होता, जो अपेक्षेपेक्षा जास्त लोक थेट पाहण्यासाठी आले होते. दरम्यान, जर्मनी हा हॉकीमधला सध्याचा विश्वविजेता आहे आणि पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये त्यांनी रौप्य पदक जिंकले होते. जर्मनीचा संघ भारत दौऱ्यावर तरुण संघासह दाखल झाला आहे. IND vs NZ 2nd Test : पुणे कसोटी सामन्यादरम्यान पावसाची शक्यता किती? जाणून घ्या, हवामान अहवाल… कर्णधार हरमनप्रीत सिंग हा जागतिक दर्जाचा ड्रॅगफ्लिकर आहे. पण या सामन्यात त्याचे अपयश दिसून आले कारण या सामन्यात टीम इंडियाला एकूण 7 पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण ‘सरपंच साहेब’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या हरमनप्रीतला एकाही पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही.