नगर | चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

राहुरी, (प्रतिनिधी): राहुरी फॅक्टरी येथे नगर-मनमाड मार्गावरील वाणी ओढा येथील हॉटेल ताईसाहेबसमोर चारचाकी व दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. गुहा येथील शंकर साहेबराव खपके असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
बुधवारी सकाळी ११ वाजता शिर्डीहून नगरच्या दिशेने जात असलेल्या चारचाकी वाहनाने (एम एच .१५ एफ व्ही. ३३५०) पाठीमागून दुचाकीस जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार हा रस्त्याच्या विरुद्ध बाजूने उडला गेला. याचवेळी शिर्डी रस्त्यावर ऊसतोडणी कामगार घेऊन जात असलेल्या वाहनाखाली तो सापडला गेल्याने जागीच ठार झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. शंकर साहेबराव खपके (वय ५५, रा. गुहा, ता.राहुरी) असे अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. खपके यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
दरम्यान, घटनास्थळी परिसरातील तरुण मंडळींनी तातडीने मदतकार्य केले. रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. घटनास्थळी सहायक पोलीस उपनिरीक्षक तुळशिदास गीते यांनी भेट देऊन पंचनामा केला. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती.





