Bihar : विरोधकांच्या बैठकीआधीच CM नितीश कुमार यांना हादरा

पाटणा :- बिहारमधील सत्तारूढ महाआघाडीतून हिंदुस्थानी अवाम मोर्चा (एचएएम) बाहेर पडला. ती घडामोड मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासाठी हादरा मानली जात आहे. नितीश यांच्या पुढाकारातून देश पातळीवर एकवटण्यासाठी अनुकूल असणाऱ्या विरोधी पक्षांची बैठक 23 जूनला पाटण्यात होणार आहे.
एकीकडे नितीश विरोधकांच्या ऐक्यासाठी झटत आहेत. मात्र, दुसरीकडे त्यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीतूनच एक पक्ष गळाला आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांचे पुत्र संतोषकुमार सुमन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
नितीश यांच्या जेडीयूकडून एचएएम विलीन करण्यासाठी दबाव येत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर एचएएम आता महाआघाडीचा घटक नसल्याची प्रतिक्रिया जेडीयूकडून देण्यात आली. त्यामुळे महाआघाडीचे दरवाजे एचएएमसाठी बंद झाल्याचे स्पष्ट होत आहे.
महाआघाडीमध्ये जेडीयू, राजद, कॉंग्रेस आणि इतर लहान पक्षांचा समावेश आहे. जेडीयूने भाजपबरोबरचे संबंध तोडल्यानंतर महाआघाडी अस्तित्वात आली. आता एचएएम भाजपशी मैत्री करणार का याविषयीची उत्सुकता बळावली आहे.





