Bihar – बिहारमधील मतदार याद्या पडताळणीला याआधीच सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्या आव्हान याचिकांवर उद्या (सोमवार) महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. बिहारमध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभा निवडणूक होईल. अशात त्या राज्यातील मतदार याद्यांची पडताळणी करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. त्यावरून मोठे राजकीय वादंग निर्माण झाले. पडताळणी प्रक्रियेमुळे मोठ्या संख्येने मतदार त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहतील, असा आक्षेप विरोधकांनी घेतला. काही राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी पडताळणीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या. त्यावर १० जुलैला प्राथमिक स्वरूपाची सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने मतदारांसाठी आधार, रेशन कार्ड आणि मतदार ओळखपत्र ग्राह्य धरण्याचा विचार करावा, अशी सूचना निवडणूक आयोगाला केली. तसेच, पडताळणी प्रक्रिया सुरू ठेवण्याची परवानगीही दिली. आयोगाने नुकताच त्या प्रक्रियेचा पहिला टप्पा मार्गी लावला आहे. त्यानंतर सुमारे ६५ लाख मतदारांची नावे विविध कारणांवरून याद्यांमधून वगळली जाऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे उद्या होणाऱ्या सुनावणीला आणखीच महत्व प्राप्त झाले आहे.