बिहार निवडणुका 2025 : एनडीए, महागठबंधन आणि जन सुराज यांच्यात तिरंगी लढत – प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया

बिहार निवडणुका 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर जन सुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी म्हटले की, यावेळी राज्यात सरळ त्रिकोणी लढत होणार आहे. एनडीए, महागठबंधन आणि जन सुराज या तीन आघाड्यांमध्येच 90 ते 95 टक्के मते विभागली जातील. बिहारची जनता यावेळी बदल घडवण्यासाठी मतदान करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रशांत किशोर म्हणाले, “बिहारची जनता आता लालू यादव किंवा प्रशांत किशोर यांच्यासाठी नाही, तर आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, रोजगारासाठी आणि बिहारमध्ये बदल घडवण्यासाठी मतदान करणार आहे. पुढील 10 वर्षांत बिहार देशातील अव्वल 10 राज्यांमध्ये स्थान मिळवेल, हा आपलं स्वप्न आहे.”
किशोर यांनी पुढे सांगितले की, लोक एनडीए आणि महागठबंधनाच्या उमेदवारांपेक्षा जन सुराजच्या उमेदवारांविषयी जास्त विचारत आहेत. “राज्यातील उरलेली पक्षीय लढत गौण ठरणार आहे. 100 पैकी 90-95 टक्के मते या तीन आघाड्यांमध्येच विभागली जाणार आहेत. आता लोकांनी ठरवले आहे की बदल करायचा आहे. एनडीए आणि भाजपाचा काळ संपला आहे. आता 15 वर्षांच्या जुन्या व्यवस्थेला परत आणायचे की जन सुराजमार्गे नवी व्यवस्था घडवायची, हे निर्णय जनता घेणार आहे,” असे ते म्हणाले.
#WATCH | On Bihar election dates, Jan Suraaj Founder Prashant Kishor says, “Voting will not be done for Lalu-Prashant Kishor. Voting will be done by people for their children, for their education and employment, for a change in Bihar. It will be for the beginning that we dream of… pic.twitter.com/HHP0D2m2a9
— ANI (@ANI) October 6, 2025
निवडणूक जाहीर झाल्यानंतर आपण पूर्णपणे तणावमुक्त झाल्याचे किशोर यांनी सांगितले. “मी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यासारखा आहे – संपूर्ण तयारी केली आहे, मग परीक्षेची भीती कशाला?”
दोन टप्प्यांत निवडणूक घेण्याचा निर्णय योग्य असल्याचे ते म्हणाले. “हे पाऊल दाखवते की भाजपलाही आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याचा फायदा होणार नाही, हे पटले आहे. पूर्वी अधिकाधिक टप्प्यांत मतदान ठेवले जात असे, जेणेकरून पंतप्रधानांचे अधिक दौरे होतील,” असे त्यांनी म्हटले.
प्रशांत किशोर यांनी सांगितले की, जन सुराजचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे. “जनतेने आता आमच्या प्रयत्नांचा विचार करून मतदान करायचे आहे. ही निवडणूक माझी किंवा जन सुराजची नाही, तर बिहारच्या विचारधारेची आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
जन सुराजकडून पहिली उमेदवारांची यादी 9 ऑक्टोबरला जाहीर होणार असून, त्यात प्रशांत किशोर यांचे नाव असण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये दोन टप्प्यांत मतदान होणार आहे – 6 आणि 11 नोव्हेंबरला मतदान तर 14 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.





