बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच प्रमुख पक्षांनी आपल्या उमेदवारी याद्या जाहीर केल्या असताना, तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाला (राजद) निवडणुकीआधीच मोठे धक्के बसले आहेत. पक्षाच्या दोन विद्यमान आमदारांनी पक्ष सोडला असून, एका उमेदवाराचा अर्ज रद्द झाल्याने राजदला एक जागा गमवावी लागली आहे. परसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार छोटेलाल राय यांनी राजदला सोडचिठ्ठी देत जनता दल युनायटेड (जदयू) मध्ये प्रवेश केला आहे, तर बनियापूरचे आमदार केदारनाथ सिंह यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही आमदारांना जदयू आणि भाजपने तात्काळ उमेदवारी जाहीर करत निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. याशिवाय, महाआघाडी आणि राजदला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कैमूर जिल्ह्यातील मोहनिया विधानसभा मतदारसंघातील राजदच्या उमेदवार श्वेता सुमन यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. 2020 च्या निवडणुकीत श्वेता सुमन यांनी आपले जन्मस्थान उत्तर प्रदेशातील चंदौली असल्याचे नमूद केले होते. मात्र, 2025 च्या निवडणुकीत त्यांनी स्वत:ला बिहारची रहिवासी दाखवले. यावरून भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली, ज्यामुळे श्वेता सुमन यांचा अर्ज रद्द झाला. परिणामी, राजदला मोहनिया ही जागा गमवावी लागली. या तिहेरी धक्क्यांमुळे राजदच्या निवडणूक रणनीतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पक्षाला आता नव्या रणनीतीसह पुढे जावे लागणार आहे.