पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत २४३ जागांपैकी २०० पेक्षा अधिक जागांवर एनडीएने बाजी मारली. यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश राज येणार हे जवळपास निश्चित आहे. भाजप तब्बल ८९ जागांवर आघाडी मिळवित अव्वल पक्ष ठरला आहे. महाराष्ट्रात महायुतीत असलेल्या अजित पवारांनी बिहार विधानसभा निवडणुकीत स्वबळावर उमेदवार उभे केले होते. परंतु, अजित पवार यांच्या पदरी मोठी निराशा आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बिहारमध्ये स्वबळावर १६ उमेदवार उभे केले होते, मात्र बहुतांश उमेदवारांना दखलपात्र कामगिरी करता आली नसून त्यांना आपले डिपॉझिटही वाचवता आले नाही. अखंड राष्ट्रवादी असताना शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने देशभरात ब-यापैकी हातपाय पसरले होते. मात्र पक्षफुटीनंतर पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेला. हा दर्जा परत मिळावा या उद्देशाने बिहारमध्ये १६ उमेदवार उभे केले होते. परंतु, सर्वच उमेदवारांनी निराशाजनक कामगिरी केली. बिहारमधील महुआ, पिंप्रा आणि मनिहारी या मतदारसंघातील उमेदवारांनी किमान हजार मताचा तरी टप्पा ओलांडला आहे. बाकी १३ उमेदवार तर २०० ते ९०० मतांच्या दरम्यान आहेत. अनेक मतदारसंघांत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला ‘नोटा’पेक्षा अल्प मतदान झाले आहे. बिहारमधील निवडणुकीची जबाबदारी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर होती. या निवडणुकीत महाराष्ट्रातील एकही स्टार प्रचारक बिहारमध्ये नव्हता. राष्ट्रवादीचे सर्व १६ उमेदवार स्वत:च्या बळावर लढले, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी दिली. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बिहारमध्ये अवघी ०.०३ टक्के मते मिळाली आहेत. तर ‘नोटा’ला राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा अधिक म्हणजे १.८२ टक्के मते आहेत.