Bihar Election : बिहारमधील 27 नेत्यांची पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत राजदमधून हकालपट्टी

पाटणा : बिहारमधील विरोधकांच्या महाआघाडीचे नेतृत्व करणाऱ्या राजदने २७ नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यामध्ये २ विद्यमान आणि ५ माजी आमदारांचाही समावेश आहे. पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत राजदने संबंधित पाऊल उचलले. विधानसभा निवडणुकीमुळे सध्या बिहारमधील राजकारण तापले आहे. अशात बंडखोरीलाही उधाण आले आहे.
बंडखोरांच्या कारवाया अटीतटीच्या बनलेल्या राजकीय रणसंग्रामात प्रमुख पक्षांची डोकेदुखी वाढवणाऱ्या ठरत आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांनी बंडखोरांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे सत्र आरंभले आहे. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राजदही मागे राहिलेला नाही. स्वपक्ष किंवा मित्रपक्षांच्या उमेदवारांविरोधात कार्य करत असल्याचे कारण देत राजदने संबंधित नेत्यांवर कारवाई केली.
तो पक्ष विरोधकांच्या महाआघाडीचे नेतृत्व करत आहे. यावेळी महाआघाडी बिहारमधील सत्ताधारी एनडीएला जोरदार टक्कर देईल, असे अंदाज वर्तवले जात आहेत. त्यामुळे महाआघाडीकडून अंतर्गत राजकीय दगाफटका होणार नाही यादृष्टीने सावधगिरी बाळगली जात आहे. ते विचारात घेता राजदने केलेली कारवाई महत्वाची मानली जात आहे. कारवाईच्या माध्यमातून राजदने मित्रपक्ष दुखावणार नाहीत याचीही एकप्रकारे निश्चिती केली आहे.





