गोळीगत सूरज चव्हाण ठरला ‘बिग बॉस’चा विजेता; जाणून घ्या त्याचा संघर्षमय प्रवास

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या 16 सदस्यांचा प्रवास फक्त एका ट्रॉफीसाठीचा होता. ‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये आलेला प्रत्येक सदस्य जिंकण्याचे ध्येय घेऊन आला.सदस्य आणि प्रेक्षक सगळ्यांनाच माहिती होतं विजेता कोणी एकच असणार.
संपूर्ण महाराष्ट्राने या सीझनला भरभरून प्रेम दिलं. घरातील प्रत्येक सदस्याने आपल्या पद्धतीने पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांची मने जिंकली. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये फक्त ‘बिग बॉस मराठी’ची चर्चा रंगत गेली.
मग ती टास्कविषयी असो, घरात होणार्या राड्यांविषयी असो वा सदस्यांच्या दिवसागणिक बदलणार्या नात्यांविषयीची असो. ‘बिग बॉस मराठी’च्या या पर्वाचा नुकताच दिमाखात महाअंतिम सोहळा पार पडला….आणि शेवटी तो क्षण आला ज्याची संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता.
महाराष्ट्राला ‘बिग बॉस मराठी’च्या या पर्वाचा विजेता मिळाला. महाराष्ट्राची मनं जिंकणारा सूरज चव्हाण ठरला ‘बिग बॉस मराठी’च्या या पर्वाचा विजेता. तर अभिजीत सावंतने पटकावले दुसरे स्थान. सूरजला 14 लाख 60 हजार इतकी धनराशी मिळाली आणि मानाची ट्रॉफी. याच सूरज चव्हाणचा बिग बॉस पर्यंतचा संघर्षमय प्रवास जाणून घेऊया…
सूरज चव्हाणचा संघर्षमय प्रवास
सूरज चव्हाणचा जन्म १९९२ मध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोडवे गावात झाला. त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. त्यामुळे त्याचे बालपण इतर सर्वसामान्य मुलांसारखे नव्हते. सूरज लहान असतानाच त्याचे वडिलाचे कर्करोगाने निधन झाले. त्यानंतर आजारपणामुळे आईचे देखील निधन झाले. सूरजला 5 मोठ्या बहिणी आहेत. त्यांनी सूरजचा सांभाळ केला. आई वडिलांचे छत्र हरपल्यामुळे सूरजला मजुरी करावी लागली. त्याला 300 रुपये दिवसाला मिळत होते. त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले. त्याचे आठवीपर्यंत शिक्षण झाले असले तरी त्याला मराठी वाचता येत नाही.
सूरजचा सोशल मीडियाचा प्रवास
सूरजला त्याच्या बहिणीच्या मुलाकडून टिकटॉक या सोशल मीडिया प्लॅटफार्मची माहिती मिळाली. त्याने इतर कोणाच्या मोबाईलवरून एक व्हिडिओ बनवला. पहिलाच व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. मग त्याने मजुरीतून मिळालेल्या पैशातून मोबाईल घेतला. अन् त्याच्या हटके स्टाईलमुळे सोशल मीडियावर तो प्रचंड लोकप्रिय झाला.
टिकटॉकवर लाखो फॉलोवर्स आहेत. पण संघर्ष त्याच्या जीवनात अजूनही होता. भारतात टिकटॉकवर बंदी आली. मात्र या मुलाने हार मानली नाही. त्याने इंस्टाग्राम व यूट्यूबवर व्हिडिओ सुरु केले. त्या ठिकाणी देखील त्याला मोठ्या प्रमाणात यश मिळाले. यानंतर त्याची तरुणाईमध्ये मोठी क्रेझ निर्माण झाली. आणि त्याला बिग बॉसच्या घरात एंट्री मिळाली.





