Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस’च्या घरात होतोय वर्णभेद? सूरज चव्हाणला मिळणाऱ्या वागणुकीवर मराठी कलाकार भडकला

Bigg Boss Marathi 5 । Suraj Chavan : जगभरात चर्चेत असणार, प्रत्येक पर्वामधून प्रेक्षकांना नवीन अनुभव देणारा, करोडो प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळवलेला, संपूर्ण भारतामध्ये हुकुमत गाजवणारा कार्यक्रम म्हणजे “बिग बॉस”… कलर्स मराठीवर बिग बॉस मराठीच्या आतापर्यंतच्या सर्वच पर्वांना अभूतपूर्व यश मिळाले आणि जेव्हा यंदाच्या सीजनाचा नवा टिझर वाहिनीवर दिसला तेव्हापासून या कार्यक्रमबद्दलच्या बऱ्याच चर्चा सुरु झाल्या होत्या.
बिग बॉस म्हणजे कॉन्ट्रोव्हर्सी क्रिएट करणाऱ्यांची जत्रा.. इथे साळसूद किंवा नॉन ग्लॅमरस माणसांना अजिबात एन्ट्री मिळत नाही… इथे तुम्ही जितके डँबिस… तितके हिट… असंही समीकरण आहे. यंदाच्या सिजनला एकदम जोरदार पद्धतीने सुरुवात झाली असून, आता हे घर पुढचे शंभर दिवस मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहे.
पुन्हा एकदा मनोरंजन, भांडण, ड्रामा अन् बरंच काही तुम्हाला या घरात पाहायला मिळणार आहे. सध्या ‘बीबी’च्या घरात दोन गट तयार झाले असून, दोघांमध्ये जोरदार राडा होताना दिसत आहे. त्यातच ‘सूरज चव्हाण’ हा स्पर्धक पहिल्या दिवसापासून त्याच्या वागण्याने सगळ्यांची मनं जिंकत आहेत. त्यामुळे त्याला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहेत.
पण सूरजचा घरातील वावर जरी प्रेक्षकांना आवडत असला तरीही घरातील एक गट सुरजवर सगळ्या कामांचा भार टाकताना दिसतोय. याबाबत चला हवा येऊ द्या फेम अभिनेता ‘अंकुर वाढवे’ने फेसबुकवर पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली. घरातील सदस्य वर्णभेद करत आहेत असा आरोपही त्याने आपल्या पोस्टमध्ये केला आहे.
अंकुर आपल्या पोस्टमध्ये म्हणतो की, “दोनही टाइम चे भांडे, साफसफाई, चपला ज्या त्याच्या नाहीत तरीही सूरज ने का कराव? सूरज सारखा काहीच होऊ शकत नाही (जे समाजवेगळे दिसतात, वागतात, बोलतात अशा सगळ्याना बोलणारे ९०%) तो या शो मधे या सगळ्यांच प्रतिनिधित्व करतोय तरीही सगळ्याना आपला गेम खेळायचा आहे. पण तो सगळं बघून घाबरलाय.
हापशीवर (हँडपंप) होणाऱ्या भांडणापेक्षा हे लय बेकार आहे आणि एवढे सुंदर दिसणारे लोक असे का वागत असतील कदाचित ह्यात तो अडकलाय. बाकी लोकांना भांडी घासता येत नाही म्हणून रडणारे आणि जरी तुझे जोडे नसतील तर,
ते बाजूला ठेव सांगणारे आणि माझे नाहीत मी नाही उचलणार म्हटल्यावर सुरजवर चढ चढ चढतात! बाकी जातीवाद, वर्णवाद आणि वर्गवाद, शिंपथी यावर मी बोलू शकत नाही एवढी समज नही माझी”. असं अंकुर त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला. दरम्यान, अंकुरच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्याच्या म्हणण्याला संमती दर्शवली आहे.





