शेअर बाजारात मोठा उलटफेर! प्रवर्तकांनी 54,732 कोटींची केली विक्री, LIC बनली ‘बिग बॉस’

मुंबई – शेअर बाजारावर नोंदलेल्या खासगी कंपन्यांच्या प्रवर्तकांचा गुंतवणुकीतील वाटा जून अखेर संपलेल्या तिमाहीत कमी होऊन 40.58 टक्क्यावर आला आहे. या कालावधीत या गुंतवणूकदारांनी विविध कारणासाठी 54,732 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.
मार्च अखेर संपलेल्या तिमाहीत प्रवर्तकांच्या गुंतवणुकीचा वाटा 40.81% इतका होता. या अगोदर सप्टेंबर 2017 अखेर संपलेल्या तिमाहीत प्रवर्तकांच्या गुंतवणुकीचा वाटा 40.81% इतका होता. त्यानंतर प्रथमच प्रवर्तकांच्या गुंतवणुकीचा वाटा कमी पातळीवर आला आहे.
प्रवर्तकांकडून खरेदी सकारात्मक समजली जाते. तर प्रवर्तक विक्री विविध कारणासाठी करीत असतात. त्यामध्ये तेजी असल्यानंतर पैसे काढून घेणे, कर्ज कमी करणे, कौटुंबिक कारण, समाज कल्याणासाठी रक्कम उपलब्ध करणे, इतर प्रकल्पात गुंतवणूक करणे तसेच किमान गुंतवणुकीची मर्यादा पाळणे या कारणाचा समावेश असतो.
ही आकडेवारी संकलित करणार्या प्राईम डाटाबेस समूहाचे व्यवस्थापकीय संचालक प्रणव हलदिया म्हणाले की, सेबीच्या मार्गदर्शक सूचनानुसार बरेच प्रवर्तक आपली गुंतवणूक कमी करीत आहेत. गेल्या 13 तिमाहीपासून त्यांच्याकडून विक्री चालू असून या कालावधीत या गुंतवणूकदारांनी 4.55 टक्क्यानी गुंतवणूक कमी केली आहे. मार्च 2022 अखेर प्रवर्तकाच्या गुंतवणुकीचे प्रमाण 45.13 टक्क्यावर गेले होते. ते आता बरेच कमी झाले आहे.
देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदार म्हणजे डीआयआयची गुंतवणूक जूनअखेर संपलेल्या तिमाहीत वाढून 17.82% झाली आहे. मार्च अखेरच्या तिमाहीत हे प्रमाण 17.62% होते. या कालावधीत या गुंतवणूकदारांनी निर्देशांकांना आधार देण्यासाठी 1.68 लाख कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. म्युच्युअल फंडांची गुंतवणूक या कालावधीत 10.35 टक्क्यावरून 10.56 टक्क्यावर गेली. त्यांनी 1.17 लाख कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.
या कालावधीत परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची म्हणजे एफआयआयची खरेदी तेरा वर्षाच्या निचांकावर जाऊन 17.04% इतकी झाली आहे. मार्च अखेर हे प्रमाण 17.22% होते. विशेष म्हणजे या तिमाहीत या गुंतवणूकदारांनी 38,674 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.
एलआयसी आघाडीची गुंतवणूकदार –
एलआयसी म्हणजे लाइफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडियाची 284 कंपन्यात एक टक्क्यापेक्षा जास्त गुंतवणूक आहे. एलआयसीचे या कंपन्यातील गुंतवणुकीचे प्रमाण 3.68% इतके आहे. विमा कंपन्यानी केलेल्या एकूण गुंतवणुकीत एलआयसीचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 69 टक्के इतके आहे. विमा कंपन्यांची एकूण गुंतवणूक 16.76 लाख कोटी रुपये इतकी आहे.




