Pune : सतीश वाघ खून प्रकरणात मोठी अपडेट; काटा काढण्यापूर्वी जादूटोणा अन् रेकी, दोषारोप पत्रातून काय आहे नवी माहिती?

पुणेः विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतिश तात्याबा वाघ यांचे अपहरण आणि हत्या या घटनेमुळे सर्वत्र मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिने प्रियकर अक्षय जावळकर याला भरीस घालून वाघ यांची हत्या केली होती, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली होती. आता वाघ यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सतीश यांचा काटा काढण्यासाठी जादूटोण्याचा प्रयोग केल्याचा धक्कादायक प्रकार आरोपपत्रातून समोर आला आहे. लष्कर न्यायालयात नुकतेच एक हजार पानांचे दोषारोपपत्र गुन्हे शाखेकडून दाखल करण्यात आले आहे. यातून ही माहिती समोर आली आहे. या दोषारोप पत्रात अक्षय आणि मोहिनीसह अतिश जाधव, पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे आणि विकास शिंदे या सहा जणांवर आरोपपत्र दाखल झाले आहे.
सतीश यांना संपवण्यासाठी जवळपास एका वर्षापासून त्यांची पत्नी मोहिनी आणि तिचा प्रियकर अक्षय जवळकर हे प्लॅनिंग करत होते. यासाठी हे दोघे घरात भेटता येत नसल्याने एका लॅाजवर भेटत असल्याची धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे. सतीश यांचा खून करण्यापूर्वी मोहिनी हिने एका मांत्रिक महिलेची देखील वाघ मदत घेतली होती
प्रकरण काय होतं?
आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून खून केल्याची धक्कादायक घटना घटना घडली होती. वाघ यांचा खून केल्यानंतर आरोपींनी त्यांचा मृतदेह उरळी कांचन येथील शिंदवणे घाटात फेकून दिला होता. या हायप्रोफाईल प्रकरणामुळे पुणे शहरासह राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. सतीश वाघ यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीनुसार हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटेनेचे गांभीर्य पाहता हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले.





