Navneet Rana : मोठा ट्वीस्ट! नवनीत राणांना राज्यसभेची लॅाटरी लागणार? भेटीमुळे चर्चांना उधाण
Navneet Rana : या चर्चा सुरू झाल्या आहेत याचे कारण म्हणजे नवनीत राणा यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतली होती.

Navneet Rana : राज्यसभेच्या 24 रिक्त जागांसह दोन पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून 18 जून रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी मतमोजणीही पार पडणार आहे. महाराष्ट्रातील राज्यसभा सदस्यपदाचा राजीनामा दिलेल्या सुनेत्रा पवार यांच्या रिक्त जागेसाठीही या निवडणुकीत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे.
माजी खासदार नवनीत राणा यांचे नाव राज्यसभा उमेदवारीसाठी चर्चेत आले असून त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. या चर्चा सुरू झाल्या आहेत याचे कारण म्हणजे नवनीत राणा यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतली होती. तसेच त्यांनी आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली आहे.
या भेटींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील रिक्त जागेसाठी नवनीत राणा यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या वाट्याची जागा त्यांच्यासाठी सोडणार का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे आगामी काही दिवसांत या घडामोडींना अधिक वेग येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Sunetra Pawar : अनिकेत तटकरेंच्या विजयावर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या?
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही या जागेसाठी अनेक नावांची चर्चा सुरू आहे. सुबोध मोहिते पाटील, अविनाश आदिक आणि प्रमोद हिंदुराव यांच्या नावांचा विचार करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. येत्या काही दिवसांत पक्षाच्या बैठकीनंतर उमेदवाराच्या नावावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
याचबरोबर ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांचे नावही राज्यसभेसाठी चर्चेत होते. मात्र, पक्ष नेतृत्व त्यांना केंद्राच्या राजकारणात पाठवण्याबाबत फारसे उत्सुक नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा निर्णय कोणाच्या बाजूने लागतो, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राज्यसभेच्या निवडणुकांचे संपूर्ण वेळापत्रक
नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख : 8 जून 2026
नामांकनांची छाननी : 9 जून 2026
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : 11 जून 2026
मतदानाची तारीख : 18 जून 2026 (सकाळी 9 ते दुपारी 4)
मतमोजणी व निकाल : 18 जून 2026 (सायंकाळी 5 वाजेपासून)
हेही वाचा : Vijay Thalapathy: मुख्यमंत्री विजय यांच्या काळ्या-पांढऱ्या पोशाखामागचं रहस्य काय? स्वतःच केला खुलासा





