प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिसरातच एका तोतया आयपीएस अधिकाऱ्याचे बिंग फुटल्याने संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे. स्वतःला आयपीएस अधिकारी म्हणवून घेत खुलेआम वावरणाऱ्या सागर घोरपडे (रा. नेरुळ, मुंबई) याला बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघमोडे याने पोलीस उपायुक्त, आयकर आयुक्त तसेच महापालिका अधिकाऱ्यांसमोर मिरवून रुबाब झाडला होता. मात्र, पोलीस आयुक्तालयाच्या पार्किंगमध्येच त्याचे बिंग फुटले. कसे फुटले रहस्य? घटनेच्या दिवशी विशेष शाखेचे उपायुक्त संदीप भाजीभाकरे हे आयुक्तालयाच्या पार्किंगमध्ये उभे होते. तेव्हाच वाघमोडे त्यांच्याजवळ आला व स्वतःला आयपीएस अधिकारी असल्याचे त्याने आत्मविश्वासाने सांगितले, परिमंडळ एकचे उपायुक्त ऋषिकेश रावले माझे बॅचमेट आहेत. मात्र, योगायोग असा की त्याच क्षणी रावले प्रत्यक्ष तेथे आले. भाजीभाकरे यांनी रावले यांना त्या व्यक्तीबद्दल विचारले असता रावले म्हणाले की, हा तोच सागर वाघमोडे आहे, ज्याच्यावर उत्तराखंडमध्ये तोतया आयपीएसचा गुन्हा दाखल आहे! आणि त्याच क्षणी बनावट अधिकाऱ्याचा खेळ संपला.या प्रकरणी जितेंद्र शहा (वय ३७, रा. घोरपडी पेठ) यांनी फिर्याद दिली. शहा हे इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसायात असून त्यांचा आणि वाघमोडेचा तीन-चार वर्षांपासून परिचय आहे. त्याने शहा यांना, मी आयपीएस अधिकारी असून, तुमच्या काही कामांसाठी मदत करू शकतो. असे सांगून विश्वास संपादन केला होता. त्याने ३१ ऑक्टोबरला शहा यांना फोन करून मेट्रो स्टेशन येथे बोलावले आणि इन्कम टॅक्स कमिशनर, उपायुक्त भाजीभाकरे आणि सहायक आयुक्त आल्फान्सो माझ्या ओळखीचे आहेत, असा दावा केला. त्यानंतर शहा आणि वाघमोडे यांनी एकत्रितपणे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेट घेतली आणि शेवटी ते दोघे आयुक्तालयात दाखल झाले जिथे हा संपूर्ण प्रकार उघड झाला. पोलीस सूत्रांनुसार, घोरपड्याची पत्नी सुद्धा पुणे शहर पोलीस दलात अधिकारी आहे, त्यामुळे तपासाचा फोकस आता या नातेसंबंधावर आणि संभाव्य अंतर्गत माहितीच्या गैरवापरावर केंद्रित करण्यात आला आहे.