Maharashtra Assembly Elections 2024 : अहिल्यानगरमध्ये अजित पवारांना मोठा धक्का ! ‘या’ नेत्यांसह कार्यकर्त्यांनी दिले राजीनामे

अहिल्यानगर : राज्यात निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. यादरम्यान अनेक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. मागच्या काही दिवसांपासून बऱ्याच नेत्यांनी अजित पवारांची साथ सोडली आहे. यादरम्यान आता अजित पवारांना अहिल्यानगरमध्ये मोठा धक्का बसला आहे.
‘या’ नेत्यांसह कार्यकर्त्यांनी दिले राजीनामे
अहिल्यानगर जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे व प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी त्यांच्या पक्षाच्या सर्व पदे व सदस्यांचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या समवेत अजित पवार गटामध्ये असणाऱ्या सर्व नागवडे समर्थक कार्यकर्त्यांनी देखील राजीनामे दिले आहे. यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते शिवाजीराव नागवडे यांचे पुत्र राजेंद्र नागवडे व अनुराधा नागवडे यांनी काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटामध्ये प्रवेश केला होता.या विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी त्यांना उमेदवारी देण्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र महायुतीकडून आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर झाली. यामुळे नागवडे यांनी अजित पवार यांची साथ सोडली आहे.





