नवी दिल्ली : देशात पूजा खेडकरचे प्रकरण गाजत असतानाच केंद्र सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) सेक्शन ऑफिसर आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या परीक्षेच्या मुलाखतीची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
त्यामध्ये जात प्रवर्गच जाहीर न केल्यामुळे यामध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप होत आहे. तसेच या संस्थेत सध्या कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या मुलांचा आणि नातेवाईकांचाच भरणा असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या संदर्भात काही विद्यार्थांनी थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रारही केली आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, सीएसआयआर परीक्षेसाठी 2023 मध्ये सेक्शन ऑफिसर आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसरच्या 444 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यासाठी या वर्षी फेब्रुवारीमध्ये टीअर 1 परीक्षा पार पडली. आता त्याचा निकाल लागला असून 100 गुणांची मुलाखत घेण्यात येणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सीएसआयआर संस्थेकडूनच घेण्यात येत आहे.
सीएसआयआर परीक्षेमध्ये मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी हे सीएसआयआर ध्ये सध्या कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचीच मुले आणि नातेवाईक असल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला. त्यामुळे या परीक्षेच्या पारदर्शकतेवर सवाल उपस्थित होत आहे. या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याने पंतप्रधान कार्यालयाच्या अख्यत्यारित असलेल्या या संस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
विद्यार्थ्यांचा आरोप केला आहे की, ज्या विद्यार्थ्यांनी टिअर 1 परीक्षेमध्ये 350 पैकी 290 हून अधिक गुण मिळवले आहे त्या विद्यार्थ्यांना 150 गुणांच्या वर्णनात्मक परीक्षेमध्ये मात्र 35 टक्केही गुण मिळाले नाहीत. यूपीएससी परीक्षेमध्ये मुलाखतीपर्यंत पोहोचलेल्या अनेक विद्यार्थ्यांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे शक्य झाले नाही. तर दुसरीकडे सीएसआयआरमध्ये कार्यरत असलेल्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांची मुले मात्र यामध्ये सहजपणे पात्र ठरल्याचा आरोप होत आहे.
जात प्रवर्गही जाहीर नाही
या मुलाखतीमध्ये जे विद्यार्थी पात्र ठरले आहेत त्यांचे गुण जाहीर करण्यात आले नाहीत. तर मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या अनेक विद्यार्थ्यांची आडनावे ही छापण्यात आली नाहीत. नेमका हाच प्रकार पूजा खेडकर प्रकरणात या आधी झाला होता. त्याचपद्धतीने मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा जात प्रवर्गही (OBC, ST, SC, PH) जाहीर करण्यात आला नाही. या प्रकरणी पंतप्रधान कार्यालयाने यामध्ये लक्ष घालण्याची गरज असून परीक्षा प्रक्रियेची सखोल चौकशी करावी, भरती प्रक्रियेच्या निष्पक्षतेतील गंभीर त्रुटींकडे लक्ष द्यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.