प्रभात वृत्तसेवा पुणे – तुकडेबंदी कायद्यात बदल केल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना नोंदणी व मुद्रांक विभागाने सर्व सह जिल्हा निबंधक यांना दिल्या होत्या. त्यानुसार या निर्णयाची अंमलबजावणी पुणे शहरात मंगळवारपासून (दि.2) सुरु होणार आहे. त्यामुळे महापालिका हद्दीतील एक-दोन गुंठे जमिन खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे. तुकडेबंदी कायद्याची कार्यपध्दती शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील रखडलेले सुमारे ५० लाख व्यवहार नियमित होणार आहेत. दि.१५ नोव्हेंबर १९६५ रोजी किंवा त्यानंतर दि. १५ आॉक्टोंबर २०२४ पर्यंत चे तुकडेबंदीचे व्यवहार नियमित होणार आहेत. तसेच हे व्यवहार नियमित करण्यासाठी पूर्वी अधिमूल्य आकारण्यात येत होते. ते सुध्दा माफ करण्यात आले आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीची नागरिक मागील काही महिन्यांपासून प्रतिक्षा करत होते. अखेर या निर्णयाची मंगळवारपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.नोंदणी व मुद्रांक विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार आता तुकडेबंदीचा दस्त नोंदविताना आता खरेदीदार आणि विक्री करणारे यांना प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. यामध्ये प्रामुख्याने नोंदणीसाठी सादर होत असलेले क्षेत्र त्यांनी यापूर्वी कोणत्याही अन्य व्यक्तीस नोंदणीकृत किंवा अनोंदणीकृत दस्तऐवजाद्वारे हस्तांतरित केलेले नाही. तसेच दस्तनोंदणीसाठी सादर केलेली सातबारा उतारा व अन्य कागदपत्रे ही खरी आहेत, अशा आशय प्रतिज्ञापत्रात नमूद करावा लागणार आहे. तुकडेबंदी संदर्भात राज्य शासनाने प्रसिध्द केलेल्या अधिसूचनेनुसार राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायत यांच्या हद्दीमध्ये तुकडेबंदी कायदा लागू असणार नाही. तसेच प्राधिकरण व प्रादेशिक आराखडा (आरपी) लागू असेल अशा हद्दीत निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक किंवा इतर कोणत्याही अकृषिक वापरासाठी असलेल्या क्षेत्रात आणि गावांच्या हद्दीपासून 200 मीटरच्या आतील क्षेत्रात तुकडेबंदी कायदा लागू असणार नाही. तुकडेबंदी संदर्भात राज्य शासनाने नुकतीच कार्यपध्दत निश्चित केली आहे. यासंदर्भात सोमवारी सर्व दुय्यम निबंधकांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. यामध्ये त्यांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती देण्यात आली. त्यांच्या शंकाचेही निरसन करण्यात आले आहे. तसेच या कार्यपध्दतीनुसार नियमांचे पालन करत दस्त नोंदणी करण्याच्या सूचना सर्व दुय्यम निबंधक यांना दिल्या आहेत, अशी माहिती सह जिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी दिली .