पुणे जिल्हा | वाहनधारकांना मोठा दिलासा , पन्नास रुपयांच्या दंडातून मुक्तता

जळोची, (वार्ताहर) – वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. रिक्षा, टॅक्सीसह इतर वाहनांना लेट पासिंगबाबत दर दिवशी आकारण्यात येणार्या पन्नास रुपयांच्या दंडातून मुक्तता करण्यात आली आहे. त्यामुळे गोरगरीब वाहन चालकांवर लाखो रुपये भरण्याची वेळ आली होती. राज्यातील अनेक मंत्र्यांना हा कायदा मागे घेण्यासाठी अनेक वाहतूक संघटनांकडून निवेदने देण्यात आली होती. अखेर शासनाने हा निर्णय रद्द करण्याची घोषणा केली.
परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राच्या नियुक्ती करण्यासाठी विलंब झाल्यास आकारण्यात येणार्या अतिरिक्त दररोज 50 रुपये, या बाबत मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी जनहित याचिका क्र. 130/2022 व रिट याचिका क्र. 11380/2017 या दोन्ही याचिकांची एकत्रित सुनावणी घेऊन दिनांक 02/04/2024 रोजीच्या आदेशान्वये दोन्ही याचिका खारीज केल्यामुळे यापूर्वी दिलेला स्थगिती आदेश उठवण्यात आला होता.
त्याच अनुषंगाने वाहनांची योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरणासाठी दररोज 50 रुपये विलंब शुल्क आकारण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. याबाबत विविध वाहतूक संघटनांनी दररोज घेतले जाणारे 50 रुपये अतिरिक्त विलंब शुल्क माफ करावे. अशी शासनाकडे मागणी केली होती.
याबाबत विधानसभेत अनेक आमदारांनी आवाज उठवला. त्याची दखल शासनाने घेऊन प्रभारी परिवहन मंत्री यांनी दि. 11 जुलै 2024 रोजी विधानसभा सभागृहात निवेदनाद्वारे पंधरा वर्षाच्या आतील सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यानंतर प्रतिदिन 50 रुपये एवढे शुल्क आकारण्याच्या कारवाईस पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्याबाबतची घोषणा केली.
त्यानुसार राज्याचे परिवहन आयुक्त यांनी दिनांक 11/07/2024 रोजी परिपत्रक क्रमांक 39/2024 नुसार राज्यातील सर्व प्रादेशिक / उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना 15 वर्षाच्या आतील सर्व परिवहन वाहनांचे विलंब शुल्क प्रतिदिन 50 रुपये आकारण्याच्या कारवाईस पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.
वाहनधारकांनी योग्यता प्रमाणपत्राची तपासणी लवकरात लवकर करून घ्यावी. दररोजचा 50 रुपये दंड माफ करण्यात आला आहे. सर्व वाहनधारकांनी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेऊन योग्यता प्रमाणपत्राची तपासणी करून घ्यावी.
-राजेंद्र केसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बारामती




