Sachin Ahir : आज गणेश विसर्जनामुळे राज्यात मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जात आहे. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत पुढच्या वर्षी लवकर या असं म्हटलं जात आहे. या सगळ्या वातावरणात उबाठा गटाच्या आमदाराने ठाकरे बंधू एकत्र येण्यावर एक मोठं विधान केलं असून, यामुळे आगामी काळात एक मोठी राजकीय मोठी घडामोड घडणार असल्याचे सूतावोच दिले आहेत. येणाऱ्या दसरा मेळाव्यात शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत मनसेप्रमुख राज ठाकरे हेदेखील दिसू शकतात, असे स्पष्ट संकेत उबाठाचे विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी दिले आहेत. त्यांनी एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत हे संकेत दिले आहेत. दसऱ्याला तुम्हाला चांगली बातमी मिळेल. कदाचित राज ठाकरे यांना आमच्या पक्षाकडून दसरा मेळाव्याचे निमंत्रण दिले जाऊ शकते, असं सचिन अहिर यांनी म्हटलं आहे. सचिन अहिर नेमकं काय म्हणाले? दसरा मेळाव्यातून कार्यकर्त्यांना दिशा द्यायची असते. त्यामुळे हा मेळावा राजकीय आणि सामाजिक दृष्टीकोनातून महत्त्वाचा आहे, असं सचिन अहिर यांनी स्पष्ट केलं आहे. दसरा मेळाव्याला हे दोघे स्टेजवर एकत्र येतील, का माहिती नाही. पण आम्ही त्यांना आमंत्रित करु शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही. आमच्याप्रमाणे त्यांचाही मेळावा असतो. त्यामुळे ते देखील आम्हाला आमंत्रित करु शकतात. यामुळे शिवतीर्थवरील दसरा मेळावा हा ‘न भूतो न भविष्यती’, अशा स्वरुपाचा असेल, असं सचिन अहिर यांनी म्हटलं आहे. दोघांनी एकत्र येणं ही काळाजी गरज गेल्या काही वर्षांपासून मुंबईची भौगोलिक परिस्थिती बदलत चालली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची यंदाची निवडणूक ही मराठी माणसासाठी अस्तित्त्वाची लढाई असेल. मुंबईचे स्वरुप आता बदलत चालले आहे. मी गेल्या काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिलो, पण आम्हाला कधी वाटलं नाही शिवसेनेसारखा पक्ष नसावा. महापालिका कोण चालवू शकते ती शिवसेना आहे, मराठी माणूस टिकवायचा असेल तर मराठी माणसाने एकत्र आलं पाहिजे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी एकत्र येऊन नेृतृत्त्व करणे, ही काळाजी गरज आहे, असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.