Yami Gautam : यामी गौतमला मिळाली मोठी संधी; राष्ट्रीय पुरस्कारानंतर ‘कहानी 3’मध्ये विद्या बालनची जागा घेणार?
Yami Gautam : मिळालेल्या माहितीनुसार, तिसऱ्या भागात विद्या बालनचा पत्ता कट करण्यात आला असून, तिच्या जागी अभिनेत्री यामी गौतमला संधी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Yami Gautam : ‘कहानी’ या चित्रपटातील अभिनयातून अभिनेत्री विद्या बालनने प्रेक्षकांना प्रभावित केले होते. या सस्पेन्स चित्रपटाच्या यशानंतर दुसरा भाग देखील रिलीज करण्यात आला होता. याही भागाला प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळाली. त्यानंतर या चित्रपटाचा तिसरा भागही येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्याविषयीची अपडेट समोर येत नव्हती. अखेर कहानी ३ वरचा पडदा उठला असून, तिसऱ्या भागाविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.
कहाणी या चित्रपटाचा पहिला भाग २०१२ मध्ये तर दुसरा भाग २०१६ मध्ये रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटात विद्याने दुर्गा राणी सिंगची भूमिका साकारली होती. आता तिसऱ्या भागावर काम सुरू करण्यात आले आहे. पिंकविलाच्या एका वृत्तानुसार, निर्मात्यांकडे ‘कहानी ३’ साठी एक नवीन कल्पना आहे. ते ही फ्रँचायझी पुढे नेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तिसऱ्या भागात विद्या बालनचा पत्ता कट करण्यात आला असून, तिच्या जागी अभिनेत्री यामी गौतमला संधी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
यामीने तिच्या चित्रपटांमधील उत्कृष्ट अभिनयासाठी प्रशंसा मिळवली आहे. याची दखल घेत तिला आर्टिकल ३७० साठी सर्वेात्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार नुकताच मिळाला. यानंतर तिला कहानी ३ साठी कास्ट करण्यात आले आहे. मात्र याबाबत चित्रपट निर्त्यांकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
‘ओएमजी २’, ‘लॉस्ट’ आणि ‘दसवी’मधील यामीच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर तिने छाप सोडली. ती नेहमीच काहीतरी वेगळ देण्याचा प्रयत्न करत असल्याचे तिच्या अभिनयातून दिसून येते. निर्माते लवकरच कहानी ३ साठी यामीच्या नावाची घोषणा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
विद्या बालनच्या ‘कहानी’ चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे सुजॉय घोष हेच तिसऱ्या भागावर काम करत आहेत. २०१२ च्या ‘कहानी’ चित्रपटात विद्याने आपल्या पतीच्या शोधात असलेल्या एका गर्भवती महिलेची भूमिका साकारली होती. तर ‘कहानी २’ मध्ये विद्या एका लहान मुलीसोबत दिसली होती. दोन्ही चित्रपट प्रेक्षकांपर्यंत आपली कथा पोहोचवण्यात यशस्वी ठरले आणि बॅाक्स अॅाफिसवर देखील चांगली कमाई केली.






