मोठी बातमी ! महिला कुस्तीपटूंचे ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधातील आंदोलन मागे; साक्षी मलिक म्हणाली,रस्त्यावरील लढाई आता”

नवी दिल्ली : कुस्तीगीर महासंघाचे मावळते अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप महिला कुस्तीपटूंनी केला होता. याप्रकरणात ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणी करत गेल्या ५ महिन्यांपासून कुस्तीपटूंचे आंदोलन सुरु होते. पण, न्यायालयात चार्जशीट दाखल झाल्याने रस्त्यावरील लढाई थांबवण्याचा निर्णय कुस्तीपटूंनी घेतला आहे. याबाबत कुस्तीपटू साक्षी मलिकने ट्विटच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
साक्षी मलिकने केलेल्या ट्वीटमध्ये, “कुस्तीपटूंची ७ जूनला सरकारबरोबर बैठक झाली. या बैठकीत सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार लैंगिक शोषण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्ली पोलिसांनी तपास पूर्ण करत १५ जूनला चार्जशीट दाखल केलं आहे. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत कुस्तीपटूंची रस्त्यावरील लढाई आता न्यायालयात सुरु राहिल.”असे म्हटले गेले आहे.
— Sakshee Malikkh (@SakshiMalik) June 25, 2023
पुढे ट्विटमध्ये “कुस्ती महासंघाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. कुस्तीसंघाची ११ जुलैला निवडणूक होऊ शकते. सरकाराने दिलेल्या आश्वासनाच्या अंमलबजावणीची आम्ही वाट पाहू,” असेही साक्षी मलिकने म्हटले आहे.
महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर करण्यात आला होता. त्याप्रकरणी ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणी करत कुस्तीपटू पाच महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले होते. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी न्यायालयात चार्जशीटही दाखल करण्यात आली आहे.त्यानुसार आता पुढील कारवाई करण्यात येणार आहे.





