Pune Velhe Taluka : मोठी बातमी! पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याच्या नामांतराला अखेर केंद्राकडून मंजुरी; काय आहे नवं नाव?

Pune Velhe Taluka : पुणे जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांनी 27 वर्षे स्वराज्याचा कारभार केला, त्या ऐतिहासिक राजगड किल्ल्याचे, स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव आता वेल्हे तालुक्याला देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. आता या निर्णयाला अखेर केंद्रांची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता वेल्हे तालुका राजगड तालुका या नावाने ओळखला जाणार आहे.
मागील काही वर्षांपासून वेल्हे तालुका आणि पुणे जिल्ह्यांतील नागरिकांची वेल्हे तालुका ऐवजी राजगड तालुका नाव करण्याची मागणी होती. अखेर त्यांच्या मागणीला खऱ्या अर्थाने केंद्राने मंजुरी दिल्याने यश आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी वेल्हे तालुका आहे. आता यासंदर्भात महाराष्ट्र सरकारचे राजपत्र जारी होणार आहे.
नावाला अखेर केंद्र सरकारकडून मान्यता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेल्हे तालुक्याचे राजगड तालुक करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. वेल्हा तालुक्याच्या नामांतरासाठी तालुक्यातील 70 पैकी 58 ग्रामपंचायतींनी महसूल विभागाकडे ठराव केला होता, या ठरावाला महसूल विभागाने मान्यताही दिली होती. मात्र, केंद्राकडून या नामांतराच्या नावावर अंतिम शिक्का मोर्तेब होणे बाकी होते. आता केंद्र सरकारने या नावाला अखेर मान्यता दिली आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या 22 नोव्हेंबर 2021 च्या सर्वसाधारण सभेत ‘राजगड’ नावाची शिफारस मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर पुणे विभागीय आयुक्तांनी यासंदर्भातील प्रस्ताव 5 मे 2022 सादर केला होता. त्यानंतर वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता.





