मुंबईः तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळात राज्यात अनेक घोषणा करून विविध योजना राबविण्यात आल्या. या योजनांपैकी सर्वात महत्वकांशी योजना ती म्हणजे ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजना. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाडक्या बहिणींना २१०० रुपये महिन्याकाठी सरकारने देण्याचे ठरवले. मात्र, आता फडणवीस सरकार शिंदेंच्या कार्यकाळातील इतर योजनांवर कात्री लावणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि पुन्हा सत्तेत महायुतीचे सरकार आले. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. राज्याच्या तिजोरीत आर्थिक भार पडत असल्याने इतर लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेणाऱ्या ५ लाख लाडक्या बहिणींना सरकारने अपात्र ठरवले आहे. तसेच शिंदेंच्या कार्यकाळातील अनेक योजनांना कात्री लावली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
राज्याची वित्तीय तूट सुमारे दोन कोटी रुपये झाली असून कर्जाचा बोजाही वाढत आहे. यामुळे एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळातील लोकप्रिय योजनांना कात्री लावण्याचा विचार फडणवीस सरकार करत आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन, शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा, लाडका भाऊ, महिलांसाठी गुलाबी रिक्षा अशा योजनांवरील खर्च कमी करण्याचा मानस असल्याचे सांगितले जात आहे.
या योजना एकदम बंद केल्यास सरकारवर टीका होण्याची शक्यता असल्याने या योजनांवरील खर्च कमी करण्यात येणार आहे. काही दिवसांवर राज्याच्या अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. तत्पूर्वी निधीच्या तरतुदीत कपात करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
या योजनांवर कात्री लागण्याच्या शक्यता
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना: जेष्ठ नागरिकांसाठी देशातील विविध तीर्थक्षेत्रांवर धार्मिक पर्यटन करण्याची योजना शिंदेंच्या कार्यकाळात जाहीर करण्यात आली होती.
शिवभोजन आणि आनंदाचा शिधा: या योजनेच्या माध्यमातून गरीब गरजूंना १० रुपयांमध्ये शिवभोजन थाळी दिली जात होती. मात्र, शिवभोजन आणि मोफत आनंदाचा शिधा या योजनेमध्ये गैरप्रकार वाढत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामुळे फडणवीस सरकार यावर काय निर्णय घेतो हे पाहवे लागेल.
लाडका भाऊ: लाडक्या बहिणीनंतर लाडका भाऊ ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार तसेच सुक्षिक्षित तरुणांना प्रशिक्षिण देण्याची योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून तरुणांना शिष्यवृत्ती देण्यात येत आहे.