मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे दोन हस्तक मारणार असल्याचा ऑडिओ मेसेज वाहतूक पोलिसांना व्हॉट्सअॅपद्वारे मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या ऑडिओ मेसेजमुळे सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईनवर सोमवारी संबंधित व्हॉट्स अॅप मेसेज प्राप्त झाला होता. त्यात सात ध्वनिफीत असून संबंधित व्यक्ती हिंदीमध्ये बोलत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबईतील वाहतूक नियंत्रण कक्षात एकापाठोपाठ एक अशा सात ऑडिओ क्लिप वाहतूक नियंत्रण कक्षाच्या नंबरवर आल्या. यामध्ये एका अज्ञात इसमाने दावा केला होता की, “अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे हस्तक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा कट आखत आहेत. तसेच, हे हस्तक देशाला बर्बाद करण्याच्या प्रयत्नात असल्याचेही या अज्ञात इसमाने म्हटले होते. दरम्यान, 20 नोव्हेंबर रोजी वाहतूक नियंत्रण क्रमांकावर 7 ऑडिओ क्लिप आणि काही मेसेज आले. त्यापाठोपाठ 21 तारखेला पुन्हा 12 ऑडिओ क्लिप आणि काही मेसेज प्राप्त झाले. या मेसेजनंतर सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यांनी तात्काळ मुंबई पोलीस, गुन्हे शाखा यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलीस पथकांनी एका हिरे कंपनीच्या व्यवस्थापकाची चौकशी केली. त्यावेळी समुप्रभात बेज नावाचा व्यक्ती काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे काम करत होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पण विविध भास होत असल्यामुळे त्याला कामावरून काढून टाकण्यात आल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.