Pratap Sarnaik : लवकरच राज्य परिवहन महामंडळ (एसटीत) मेगाभरती केली जाणार असल्याची मोठी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. या भरतीमध्ये एकूण १७ हजार ७४२ पदे भरली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ही घोषणा मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानपरिषदेत केली आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांना आणि सध्या कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परिवहन विभागाने या पदभरतीचा प्रस्ताव राज्य सरकारच्या वित्त विभागाकडे सादर केला आहे. या विभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. एसटीची प्रवासी सेवा अधिक सक्षम करण्यासाठी मनुष्यबळाची अत्यंत गरज आहे. वित्त विभागाची तांत्रिक मंजुरी मिळताच या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. यानतंर ही प्रक्रिया युद्धपातळीवर राबवली जाईल, अशी महत्वाची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या भरती प्रक्रियेत २०२२ च्या एसटी संपादरम्यान सेवा खंडित होऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना या भरती प्रक्रियेत प्राधान्य देण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. विधान परिषदेत श्रीकांत भारतीय यांनी एसटीमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. भरती प्रक्रिया का राबवली जात आहे? खरेतर राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात एसटी बसेसच्या संख्येत वाढ होत आहे. महायुती सरकारने दरवर्षी ५,००० नवीन बसेस खरेदी करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. यासाठी ८,००० नवीन बसेस खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एकीकडे बसेसची संख्या वाढत असताना दुसरीकडे चालक, वाहक आणि कार्यशाळेतील तंत्रज्ञांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया राबवून मनुष्यबळ वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. हेही वाचा : Monalisa Viral Girl: कुंभमेळ्यातून प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाचे केरळमध्ये अचानक लग्न; ‘लव्ह जिहाद’च्या आरोपांमुळे वाद