मुंबई – मागील तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढणारे केंद्रीयमंत्री नारायण राणे अटकेच्या कारवाईनंतर पुन्हा एकदा जन आशीर्वाद यात्रेसाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे राणे यांच्या यात्रेला महत्त्व प्राप्त झालं आहे. मात्र या यात्रेतच राणेंना वीजेचा शॉक बसल्याचं समोर आलं आहे.
नारायण राणे शुक्रवारी कणकवली शहरातील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गेले होते. केंद्रीयमंत्री येणार असल्यामुळे प्रशासनाने तिथं विद्युत रोषणाई केली होती.
दरम्यान महाराजांना अभिवादन करण्यासाठी जात असताना तेथील विद्युत रोषणाईच्या तारेतून कठड्यांमध्ये विद्युत प्रवाह पसरला. या कठड्याला हात लावताच राणे यांना शॉक बसला.
मोठी बातमी : जन आशीर्वाद यात्रेत नारायण राणेंना बसला वीजेचा ‘शॉक’ ! pic.twitter.com/s3Q2Pc1AzP
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) August 28, 2021
शॉक लागताच राणे यांनी हात मागे केला. सुदैवाने राणेंना यात कोणतीही दुखापत झाली नाही. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील उपस्थित होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.