मोठी बातमी: ड्रग्स माफिया ललित पाटील याला अखेर अटक; मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी

पुणे – मागील काही दिवसांपासून फरार असलेला ड्रग्स माफिया ललित पाटील याला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्ज माफीया ललित पाटील याचा शोध पोलीस घेत होते. त्यासाठी पोलीसांची दहा पथके देखील तयार करण्यात आली होती. अखेर मुंबई पोलिसांनी ललित पाटील याला चेन्नईमधून ताब्यात घेतले आहे.
यापूर्वी ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील याला अटक करण्यात आली होती. तसेच त्याला तपासासाठी नाशिकला आणण्यात आले होते. नाशिकच्या उपनगर परिसरात असलेल्या भूषण पाटील याच्या घरी पुणे पोलिसांनी तपास केला. तसेच ज्या ठिकाणी कारवाई करण्यात आली, त्या ड्रग्स कारखान्यावर देखील भूषणला तपासासाठी नेण्यात आले होते. या तपासाप्रकरणी पुणे पोलिसांसह नाशिक पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.
प्रकरण काय आहे?
ससून रुग्णालयातील कॅन्टीनमधील कामगारामार्फत पुरविण्यात येत असलेला 2 कोटी 14 लाख रुपयांचा मेफेड्रोन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. त्याचा पुरवठा करण्यापूर्वी भूषण आणि अभिषेक यांनी ललितचा साथीदार सुभाष मंडल याला अमली पदार्थाचा नमुना दिला होता.त्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना तपासात मिळाले आहे. त्यामुळे अंमल पदार्थ विक्री करणाऱ्यांची साखळी निष्पन्न झाली आहे.
या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील हा फरार झाला होता. 15 दिवस उलडून गेल्यानंतरही तो सापडत नसल्याने पोलिस यंत्रणेवर टीका होऊ लागली होती. ललित पाटील याला ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. नऊ महिने उपचार घेतल्यानंतर तो फरार झाला होता. पोलिसांनी चौकशीदरम्यान ललित आणि त्याचा भाऊ भूषण हे दोघे मिळून नाशिक मध्ये ड्रग्ज बनवण्याचा कारखाना चालवत असल्याची माहिती समोर आली होती.





